कोल्हापूर: गेल्या हंगामाच्या तुलनेत देशात साखरेचे उत्पादन सुमारे १२ ते १५ टक्के वाढल्याचा अंदाज ‘इस्मा’ने वर्तविला आहे.यामुळे साखर कारखान्यांकडे मुबलक साठा उपलब्ध असून विक्रीचा दबाव वाढला आहे. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राच्या साखर विक्री कोट्यात मार्चच्या तुलनेत किरकोळ वाढ करण्यात आली आहे. राज्याला एप्रिल महिन्यासाठी ८ लाख १६ हजार ९०८ टन कोटा मिळाला आहे. मार्चच्या तुलनेत यात ४,७१० टनांची वाढ झाली आहे. उन्हाळा असूनही सध्या तरी मागणी स्थिर असल्याचे साखर उद्योगाच्या प्रतिनिधींनी सांगितले. यामुळे एप्रिल महिन्यात चांगला कोटा दिला असला तरी हा कोठा पूर्ण विक्रीचे आव्हान कारखान्यांपुढे सध्या तरी आहे.
सद्यस्थितीत उन्हाळा सुरू झाला असला, तरी शीतपेय आणि आइस्क्रीम उद्योगांकडून येणारी मागणी अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू झालेली नाही. मोठ्या ग्राहकांकडून सावध खरेदी होत असल्याने खुल्या बाजारात दर स्थिर आहेत. केंद्र सरकारने उत्तर प्रदेशला ७ लाख ८३ हजार ३६७ टन कोटा देण्यात आला आहे. मार्चच्या तुलनेत यात २८ हजार १७१ टनांची लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान साखर दर दबावात असल्याने कारखान्यांकडे रोख रकमेची चणचण भासत आहे. युद्धामुळे अनेक व्यावसायिकांवर व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. यामुळे मिठाई व तत्सम उद्योगातूनही साखरेची फारशी मागणी नाही.


















