पुणे : राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी दिल्याची बनावट माहिती साखर आयुक्तालयास पाठवली आहे. अद्याप सुमारे ३,५०० कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. शेट्टी यांनी बुधवारी साखर आयुक्तालयात डॉ. कोलते यांची भेट घेतली. यावेळी कारखानानिहाय तातडीने चौकशी करून संबंधितांवर जप्तीची कारवाई करण्याची मागणी त्यांनी साखर आयुक्तांकडे केली. डॉ. कोलते यांनी येत्या आठवडाभरात राज्यातील साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपीबाबतची वास्तव माहिती घेऊन बनावट माहिती दिली असेल त्यांची चौकशी करून कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशी ग्वाही दिली.
राज्यातील साखर कारखान्यांचा २०२५-२६ चा ऊस गाळप हंगाम संपून जवळपास अडीच महिने झाले आहेत. तरीही कारखान्यांनी संपूर्ण रक्कम न दिल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. कारखानदारांनी केंद्र सरकारकडून अनुदान किंवा पॅकेज मिळविण्यासाठी शेवटच्या दीड महिन्यात गाळप झालेल्या उसाची एफआरपी अदा केलेली नाही. याचा फटका राज्यातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी साखर सहसंचालक व लेखापरीक्षक यांच्यामार्फत थकीत एफआरपीबाबत कारखानानिहाय तातडीने चौकशी करून कारवाई करावी. संबंधित साखर कारखान्यांवर महसुली वसुली प्रमाण-पत्रानुसार (आरआरसी) जप्तीची कारवाई सुरू करावी, असा आग्रह शेट्टी यांनी चर्चेत धरला. चर्चेत त्यांनी साखरेच्या विविध प्रलंबित विषयांवर चर्चा करून ते प्रश्न सोडविण्याची मागणी केली. यावेळी साखर संचालक (प्रशासन) डॉ. केदारी जाधव, सहसंचालक (अर्थ) सचिन रावल आणि शेतकरी उपस्थित होते.


















