मुंबई : राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी व साखर कारखान्यांना दिलासा मिळावा यासाठी सहकारी साखर कारखान्यांना २०२५-२६ च्या गाळप हंगामातील थकीत एफआरपीची रक्कम देण्यासाठी आणि चालू गाळप हंगामातील पूर्वतयारीसाठी निधी उपलब्ध व्हावा याकरिता सॉफ्ट लोन योजना सुरु करण्याचा निर्णय सरकारने १५ सप्टेंबरला घेतला होता. कारखान्यांची आर्थिक स्थिती विचारात घेऊन शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यासाठी आणि पुढील हंगामाच्या पूर्वतयारीसाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने ही योजना आणली असून त्यानुसार कारखान्यांनी घेतलेल्या कर्जाचे व्याज अनुदान सरकार भरणार असून त्यासाठी ७३८.५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. योजनेंतर्गत सुरुवातीस बँकांनी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मंजुरी व वितरित केलेली कर्ज रक्कम व्याज अनुदानास पात्र राहील, अशी तरतूद होती. मात्र सरकारने उशिरा योजना जाहीर केल्याने कर्ज काढण्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता योजनेचा कालावधी आता ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. याबाबतचे वृत्त दैनिक ‘लोकसत्ता’ने दिले आहे.
राज्यात गतवर्षीच्या गाळप गाळप हंगामात १०२ सहकारी साखर कारखान्यांनी ५२७.५१ लाख मेट्रीक टन ऊस गाळप केला होता. मात्र आर्थिक अडचणींमुळे अनेक कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची देणी दिलेली नाहीत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत एफआरपीची रक्कम देण्यासाठी आणि गाळप हंगामातील पूर्वतयारीसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी सहकारी साखर कारखान्यांसाठी जाहीर केलेल्या सॉफ्ट लोन योजनेत सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता योजनेतून घेतलेल्या कर्जाचा वापर विविध कारणांसाठी करण्याची तसेच योजनेची मुदत महिनाभर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेत मंजुर झालेल्या कर्जाचा उपयोग थकीत एफआरपी देण्यासाठीच करण्याची अटही शिथिल करण्यात आली असून ज्या कारखान्यांची एफआरपी थकीत नाही त्यांना ही रक्कम अन्य कारणांसाठी वापरण्याची मुभा देण्यात येणार आहे.


















