पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाबाबत ठोस भूमिका घेतली आहे. साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील व संचालक जयप्रकाश दांडेगावकर यांनी संघाची भूमिका सोमवारी (ता.३) जाहीर केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉल मिश्रणाचे स्वागतच केले पाहिजे, असे साखर संघाच्यावतीने त्यांनी जाहीर केले. दिल्लीमधूनच इथेनॉलविरोधात मोठा कांगावा होतो आहे. इथेनॉल मिश्रणावरून उलटसुलट चर्चा घडवून आणली जात आहे. त्यातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आरोप करीत मूळ विषय भरकटवला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण धोरणाला साखर संघाचा सक्रिय पाठिंबा आहे. देशहितासाठी इथेनॉल मिश्रण कार्यक्रम विस्कळीत होऊ नये, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे असे त्यांनी सांगितले.
संघाचे अध्यक्ष पाटील व संचालक दांडेगावकर म्हणाले की, केंद्र शासनाने उसाचा रस व बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस परवानगी दिली. त्यामुळेच साखरेचे जादा साठे नियंत्रणात आले. आता इथेनॉल व्यवसायात जवळपास ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यातून ग्रामीण औद्योगिकीकरणाला हातभार लागला. गुंतवणुकीमुळे साखर उद्योगात दोन हजार कोटी लिटर इथेनॉलची स्थापित क्षमता निर्माण झाली आहे. यातून १२ ते १३ लाख लोकांना रोजगार मिळतो आहे. इथेनॉल मिश्रण धोरणामुळेच शेतकऱ्यांना वेळेत एफआरपी देता येत आहे. या धोरणामुळेच शेतकरी अन्नदाता ते ऊर्जादाता झाला आहे, ई-२० इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाचे उद्दिष्ट २०३० ऐवजी जलद गतीने २०२३ मध्येच पूर्ण झाले. यातून काही प्रमाणात वाहनधारकांना समस्या जाणवत आहेत. मात्र, या समस्येची व्याप्ती महाभयंकर नाही. योग्य चर्चा घडवून या समस्येचे निराकरण करता येईल.


















