महाराष्ट्र : राज्याचे जैवइंधन व जैवऊर्जा निर्मिती धोरण मंजुरीच्या प्रक्रियेत, साखर उद्योगाला होणार मोठा लाभ

पुणे : राज्यातील साखर उद्योगाच्या विस्तारासाठी धोरणात्मक निर्णय लवकरच होण्याची अपेक्षा आहे. मंत्री समितीच्या बैठकीत करण्यात आलेल्या सूचनेनुसार ‘महाराष्ट्र साखर उद्योगातील जैवइंधन व जैवऊर्जा निर्मिती धोरण २०२६’ला मंजुरी मिळावी यासाठी हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. या धोरणाच्या माध्यमातून साखर कारखान्यांना जैवइंधन, जैवऊर्जा आणि उपपदार्थ निर्मितीच्या प्रकल्पांकडे वळण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. साखर कारखान्यांना जैवइंधन, जैवऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार,सध्या राज्यातील १५६ इथेनॉल उत्पादन युनिटची एकत्रित क्षमता २९७ कोटी लिटर आहे. यातून साखर उद्योगात सात हजार कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न झाल्याचा अंदाज आहे. सहवीज निर्मितीतूनही उद्योगाला सुमारे एक हजार ९०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. या पार्श्वभूमीवर जैवइंधन आणि जैवऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणामुळे साखर कारखान्यांच्या उत्पन्नाचे पर्यायी स्रोत वाढविण्यावर भर राहणार आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

राज्यातील साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता इथेनॉल, सहवीज निर्मिती तसेच अन्य जैवऊर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून उत्पन्नाचे स्रोत वाढवावेत, हा धोरणाचा उद्देश आहे. त्यासाठी कारखान्यांना भागभांडवल, व्याज आणि भांडवली सवलती तसेच जीएसटी आणि मुद्रांक शुल्कात सवलती देण्याच्या तरतुदी प्रस्तावित आहेत. या सवलतींमुळे नव्या प्रकल्पांची उभारणी आणि सध्याच्या प्रकल्पांचा विस्तार करण्यास मदत होऊ शकते.

या धोरणाबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. याविषयी माहिती देताना साखर आयुक्त डॉ. संजय कोलते म्हणाले की, साखर उद्योगाला अधिक शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जैवइंधन व जैवऊर्जा निर्मितीला प्रोत्साहन देणाऱ्या धोरणाचा मसुदा साखर आयुक्तालयाने तयार केला आहे. सध्या या धोरणाची मंत्रालय स्तरावर प्रक्रिया सुरू आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here