महाराष्ट्र : साखर कारखान्यांच्या गाळप क्षमतेचा होणार अभ्यास, आर्थिक सक्षमता तपासण्यासाठी समिती स्थापन

सोलापूर : राज्यातील साखर कारखान्यांची गाळप क्षमता चार गटांमध्ये विभागून त्याचा अभ्यास केला जाणार आहे. यामध्ये २ हजार ५०० मेट्रिक टन, २ हजार ५०० ते ५ हजार मेट्रिक टन, ५ हजार ते १० हजार मेट्रिक टन आणि १० हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त अशा गाळप क्षमतेनुसार कारखान्यांच्या आर्थिक सक्षमतेचा अभ्यास केला जाणार आहे. याचा या सखोल अभ्यासासाठी शासनाने साखर उद्योगातील तज्ज्ञ व्यक्तींची विशेष अभ्यास समिती स्थापन केली आहे. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. राज्यातील ऊस क्षेत्र, ठिबक सिंचन योजना, जलयुक्त शिवार योजना, ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय.) तंत्रज्ञानाचा वापर तसेच मर्यादित ऊस क्षेत्रात ऊस उपलब्धता वाढीसाठी त्रिसूत्रीचा अभ्यास करायचा आहे.

राज्यातील प्रत्येक कारखाना गाळप हंगामात कारखाना किमान किती दिवस चालल्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील, याचा सखोल अभ्यास करून अहवाल सादर करण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे. साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी त्यांच्या गाळप क्षमतेनुसार किमान किती दिवस कारखाना चालणे आवश्यक आहे हे तपासले जाईल. यात शास्त्रीय, आर्थिक आणि तांत्रिक बाबींचा विचार केला जाईल. त्यानुसार धोरण निश्चित केले जाणार आहे. समितीत सोलापूर जिल्ह्यातील निवृत्त अधिकारी डॉ. संजय भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढविलेली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाचे दिवस कमी झाले आहेत. त्याची सद्यस्थिती या अभ्यासातून स्पष्ट होईल.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here