महाराष्ट्र : १३९ खासगी साखर कारखान्यांना सॉफ्ट लोन योजनेतून वगळल्याने कारखानदार नाराज

मुंबई : राज्य सरकारच्या सॉफ्ट लोन योजनेतून खासगी साखर कारखान्यांना व्याज अनुदानासाठी अपात्र ठरविण्यात आल्याने खासगी साखर उद्योगातून नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयाचा फेरविचार करून खासगी कारखान्यांनाही योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी वेस्ट इंडियन शुगर असोसिएशनने (विस्मा) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भातील वृत्त ‘अॅग्रोवन’मध्ये प्रसिद्ध झाले आहे.

सहकार विभागाचे सहसचिव अंकुश शिंगाडे यांनी २२ सप्टेंबर २०२६ रोजी सॉफ्ट लोन योजनेचे आदेश जारी केले. या आदेशानुसार, योजना केवळ सहकारी साखर कारखान्यांसाठी लागू करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सहकारी साखर कारखान्यांनी बँकांकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजासाठी अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, खासगी साखर कारखान्यांना व्याज अनुदानाचा लाभ मिळणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

एफआरपी आणि हंगामपूर्व तयारीसाठी कर्जाची गरज

२०२५-२६ च्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांची थकीत रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम अदा करण्यासाठी तसेच २०२६-२७ च्या आगामी गळीत हंगामाच्या पूर्वतयारीसाठी साखर कारखान्यांना दीर्घ मुदतीच्या कर्जाची आवश्यकता आहे. या कर्जावरील व्याजाचा आर्थिक भार कमी करण्यासाठी राज्य सरकारने सॉफ्ट लोन योजना सुरू केली आहे.मात्र, खासगी कारखान्यांना केवळ कर्ज मिळविण्यासाठी पात्र ठरवून व्याज अनुदानापासून वंचित ठेवण्यात आल्याने या योजनेत भेदभाव होत असल्याची भूमिका विस्माने घेतली आहे.

खासगी कारखाने आणि ऊस उत्पादकांवर आर्थिक संकटाची भीती

‘विस्मा’चे सरचिटणीस पांडुरंग राऊत आणि कार्यकारी संचालक अजित चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात या निर्णयामुळे खासगी साखर कारखाने आणि त्यांना ऊस पुरविणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मागील गळीत हंगामात साखरेचा विक्रीदर प्रतिकिलो ३८ रुपये होता, तर उत्पादन खर्च ४१.८२ रुपये प्रतिकिलो इतका होता. त्यामुळे साखरेच्या विक्रीतून उत्पादन खर्चाची पूर्ण भरपाई करणे कारखान्यांसाठी कठीण झाले. त्यातच उसाची उपलब्धता कमी असल्याने खासगी कारखान्यांना आर्थिक फटका बसला. कमी गाळपामुळे प्रशासकीय आणि स्थिर खर्चातही वाढ झाली आहे.दुसरीकडे, इथेनॉलच्या दरातही वाढ झालेली नसल्याने कारखान्यांच्या आर्थिक अडचणी अधिक तीव्र झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची एफआरपी वेळेत अदा करण्यासाठी खासगी साखर कारखान्यांनाही सॉफ्ट लोन योजनेचा संपूर्ण लाभ मिळणे आवश्यक असल्याचे विस्माने म्हटले आहे.

राज्याच्या साखर आणि इथेनॉल उत्पादनात खासगी कारखान्यांचा मोठा वाटा

मागील हंगामात राज्यात १०८ खासगी आणि १०२ सहकारी अशा एकूण २१० साखर कारखान्यांनी गाळप केले. यापैकी २८ सहकारी साखर कारखाने शासनाच्या मान्यतेने खासगी उद्योजकांकडून चालविले जात आहेत.राज्याच्या साखर उत्पादनासह इथेनॉल निर्मिती, सहवीज निर्मिती आणि शेतकऱ्यांना एफआरपी अदा करण्यात खासगी साखर कारखान्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळे शासनाने खासगी आणि सहकारी कारखान्यांमध्ये भेदभाव न करता दोन्ही क्षेत्रांना समान संधी द्यावी, अशी मागणी खासगी साखर उद्योगाकडून करण्यात येत आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here