कोल्हापूर : थकीत वेतन, बंद व आजारी साखर कारखान्यांतील कामगारांचे पुनर्वसन, कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेणे यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाने पुकारलेला बेमुदत संप तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कामगारांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संबंधित विभागांचे अधिकारी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची लवकरच संयुक्त उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.
कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत साखर कामगारांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ, अहमदनगर आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, पुणे या संघटनांनी यापूर्वी शासनाकडे आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले होते. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले. या बैठकीला राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस राऊसाहेब पाटील, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, प्रदीप शिंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये थकीत वेतनाची तातडीने अदा करणे, बंद व आजारी साखर कारखाने पुन्हा सुरू करून तेथील कामगारांचे पुनर्वसन करणे, कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगारांच्या वेतनासंबंधीचे प्रश्न सोडविणे, कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे तसेच महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम, १९४६ पूर्ववत लागू करणे यांचा समावेश आहे. याशिवाय साखरेचा किमान विक्री दर प्रतिकिलो ५० रुपये करण्याची मागणीही कामगार संघटनांनी केली आहे.
या संपात राज्यातील सात सहकारी आणि तीन खासगी साखर कारखान्यांमधील कामगार सहभागी झाले होते. प्रलंबित प्रश्नांवर संबंधित विभागांच्या समन्वयातून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन शासनाकडून मिळाल्यानंतर महासंघाने आंदोलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला. आता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या आगामी बैठकीत कामगारांच्या मागण्यांवर कोणते निर्णय घेतले जातात, याकडे राज्यातील साखर कामगारांचे लक्ष लागले आहे.


















