मुंबई : राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील मंत्रालयात झालेल्या या बैठकीत ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य व शेतकरी प्रतिनिधी सचिन नलवडे यांनी राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी १५ जानेवारीनंतरचे ऊस बिल अद्याप शेतकऱ्यांना दिले नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी न देता, सर्व बिले अदा केल्याचे खोटे अहवाल सादर केल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यातील साखर उद्योग आणि शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नांवर मंत्रालयात ऊस नियंत्रण मंडळाची ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
अर्थ विभागाचे सचिव ओम प्रकाश गुप्ता, सहकार विभागाचे सचिव प्रवीण दराडे, ऊस नियंत्रण मंडळ सदस्य सुहास पाटील, पृथ्वीराज जाचक, सहकार विभाग अधिकारी उपस्थित होते. मुख्य सचिवांनी साखर आयुक्त संजय कोलते यांना स्पष्ट निर्देश दिले की, प्रत्येक कारखान्याकडून शेतकऱ्यांची व ऊस गाळपाची माहिती तपासून, एफआरपी पूर्ण मिळाली का याची पडताळणी करावी. बैठकीत थकीत ऊस बिलांचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. ऊस बिल थकीत असणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे यांनी केली. केंद्र सरकारने साखरेची आधारभूत किंमत प्रतिकिलो ५० रुपये करावी, साखरेला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळावे, साखर कारखान्याबाहेर शासकीय वजन काटे बसवावेत, ऊस तोडणी व वाहतूक दराचा फेरविचार करावा अशा मागण्या करण्यात आला.


















