महाराष्ट्र : ऊस उत्पादकांना मिळाली २९ हजार ६९६ कोटींची एफआरपी

कोल्हापूर : राज्याच्या साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या अहवालानुसार, यंदाच्या गळीत हंगामात, २०२३-२४ मध्ये ३१ मार्चअखेर साखर कारखान्यांनी एकूण देय असलेल्या एफआरपीच्या रकमेपैकी ९४.२४ टक्के रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा करण्यात आली आहे. चालू हंगामात एफआरपीची देय रक्कम ३१ हजार ५१० कोटी रुपये आहे. त्यापैकी शेतकऱ्यांना ऊसतोडणी वाहतूक खर्चासह २९ हजार ६९६ कोटी देण्यात आले असल्याचे आयुक्तालयाने स्पष्ट केले आहे. तर राज्यातील २०६ कारखान्यांपैकी ९६ साखर कारखान्यांकडे अजून शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम बाकी आहे.

राज्यात मार्चअखेरपर्यंत १,०३८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. त्यानुसार उसाची रास्त आणि किफायतशीर किंमतीचे (एफआरपी) अद्याप १,८१४ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. ११० साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपीची शंभर टक्के रक्कम दिलेली आहे. ५२ कारखान्यांनी ८० ते ९९ टक्के रक्कम तर २९ कारखान्यांनी ६० ते ७९ टक्के एफआरपी दिली आहे. शेतकऱ्यांना शून्य ते ५९ टक्के रक्कम देणाऱ्यांमध्ये १५ कारखान्यांचा समावेश आहे. जे कारखाने शेतकऱ्यांच्या पैसे देण्यात विलंब लावतील, अशा कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here