नवी दिल्ली : देशाच्या ऊर्जा सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने कर्नाटकातील मंगळुरू येथे 1.75 दशलक्ष मेट्रिक टन (17.5 लाख मेट्रिक टन) क्षमतेचा रणनीतिक पेट्रोलियम साठा (Strategic Petroleum Reserve – SPR) उभारण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. ओएनजीसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पाच्या स्वरूपात मंगळुरू (फेज-1 विस्तार) येथे आवश्यक सुविधांसह हा प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे.
व्यावसायिक वापरासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा…
संचालक मंडळाने या प्रकल्पाच्या व्यावसायिक वापराच्या संधी अधिक व्यापक करण्यासाठी आवश्यक नियामक सवलती मिळाव्यात, यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही कंपनीला दिले आहेत.भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा कच्च्या तेलाचा आयातदार आणि ग्राहक देश आहे. देशाच्या एकूण तेल गरजेपैकी 85 टक्क्यांहून अधिक गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. त्यामुळे जागतिक पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यास किंवा भू-राजकीय संकट उद्भवल्यास अशा रणनीतिक पेट्रोलियम साठ्यांचे महत्त्व अधिक वाढते.
देशात आधीपासून उपलब्ध आहेत रणनीतिक तेलसाठे…
सध्या भारतात विशाखापट्टणम (1.33 एमएमटी), मंगळुरू (1.5 एमएमटी) आणि पडूर (2.5 एमएमटी) येथे एकूण 5.33 एमएमटी क्षमतेचे रणनीतिक पेट्रोलियम साठे उपलब्ध आहेत. या साठ्यांचे व्यवस्थापन इंडियन स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह लिमिटेड (ISPRL) मार्फत केले जाते.याशिवाय केंद्र सरकारने ओडिशातील चांदीखोल (4 एमएमटी) आणि पाडूर (2.5 एमएमटी) येथे आणखी 6.5 एमएमटी क्षमतेच्या व्यावसायिक व रणनीतिक साठा प्रकल्पांनाही मंजुरी दिली आहे.नव्या प्रकल्पामुळे मंगळुरू येथे आणखी 1.75 एमएमटी क्षमतेची भर पडणार असून, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील हा महत्त्वाचा रणनीतिक पेट्रोलियम साठा केंद्र अधिक सक्षम होणार आहे.
ऊर्जा सुरक्षेसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य…
भारताने अलीकडील काळात ऊर्जा सुरक्षेसाठी अनेक देशांशी सहकार्य वाढवले आहे. मंगळुरू येथील साठा केंद्रात अबू धाबी नॅशनल ऑइल कंपनी (ADNOC) चा कच्चा तेलसाठाही कराराअंतर्गत ठेवण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत भारताला या साठ्याचा वापर करण्याचा अधिकार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त अरब अमिराती दौऱ्यादरम्यान ADNOC ने भारतातील कच्च्या तेलाच्या साठवण क्षमतेत वाढ करण्यास आणि रणनीतिक पेट्रोलियम साठा कार्यक्रमात अधिक सहकार्य करण्याची तयारी दर्शवली होती.
आपत्कालीन परिस्थितीत देशासाठी सुरक्षा कवच…
रणनीतिक पेट्रोलियम साठे म्हणजे सरकारच्या नियंत्रणाखाली ठेवलेला कच्च्या तेलाचा राखीव साठा. युद्ध, नैसर्गिक आपत्ती, जागतिक पुरवठ्यातील अडथळे किंवा आंतरराष्ट्रीय बाजारातील मोठ्या संकटाच्या काळात या साठ्याचा उपयोग देशाच्या इंधन गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो. भारत वाढत्या इंधन मागणीच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा सुरक्षेला अधिक बळकट करण्यासाठी अशा साठ्यांचा विस्तार करत आहे.


















