लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी ५२ रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने साखर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी साखरेच्या दरांचा आढावा घेण्यासाठी साखर उद्योग आणि ऊस विकास विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी जनतेला साखर खरेदी करताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार, साखर उद्योग आणि ऊस विकास विभागाकडून सर्वसामान्य नागरिकांना केवळ ५२ रुपये प्रतिकिलो दराने साखर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
साखरेच्या विविध पॅकेटचे दर निश्चित
लालबहादूर शास्त्री ऊस किसान संस्थानच्या परिसरात असलेल्या साखर निगम आणि सहकारी साखर कारखाना महासंघाच्या विक्री केंद्रातून नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. विभागाने साखरेच्या विविध पॅकेटचे दर पुढीलप्रमाणे निश्चित केले आहेत.
१ किलो पॅकेट : ५२ रुपये
२ किलो पॅकेट : १०२ रुपये
५ किलो पॅकेट : २५० रुपये
५० किलो पॅकेट : २,५०० रुपये
दररोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत विक्री
विभागाच्या माहितीनुसार, साखरेची ही विशेष विक्री प्रत्येक कामकाजाच्या दिवशी नियमितपणे सुरू राहणार आहे. नागरिकांना ऊस किसान संस्थानच्या परिसरातील विक्री केंद्रावर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत जाऊन साखर खरेदी करता येईल. ग्राहकांना सुलभतेने साखर खरेदी करता यावी आणि विक्री प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी केंद्रावर आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या आहेत. नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजेनुसार साखर खरेदी करता येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन
ऊस विकास विभागाने लखनौमधील नागरिकांना या जनहिताच्या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही सर्वसामान्य जनतेला अशाच प्रकारे दिलासा देणाऱ्या उपाययोजना राबवण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांना आवश्यक वस्तू परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या अडचणी कमी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


















