मुंबई: E20 (20 टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोल) धोरणावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या कथित मानहानीकारक पोस्ट तात्काळ हटवण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने या पोस्टना “अत्यंत घृणास्पद, अश्लील, अपमानास्पद आणि बदनामीकारक” असे संबोधत मेटा, गूगल एलएलसी आणि एक्स कॉर्प (माजी ट्विटर) यांना त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले. बुधवारी सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, प्रथमदर्शनी या पोस्ट अपमानास्पद, घृणास्पद आणि अश्लील स्वरूपाच्या आहेत.
सोशल मीडिया कंपन्यांना न्यायालयाचा सवाल
न्यायमूर्तींनी मेटा, एक्स कॉर्प आणि गूगल एलएलसी यांना विचारले की, एखाद्या व्यक्तीला न्यायालयात जावे लागू नये, यासाठी अशा प्रकारची सामग्री स्वयंचलितपणे हटवण्याची कोणतीही यंत्रणा त्यांच्या प्लॅटफॉर्मवर नाही का? न्यायालयाने म्हटले की, अशा प्रकारचे पोस्ट सोशल मीडिया कंपन्यांनी स्वतःहून हटवायला हवे. न्यायमूर्ती म्हणाले, “तुमच्याकडे इतके प्रगत तंत्रज्ञान असताना, अश्लील किंवा अपमानास्पद मजकूर अपलोड होताच तो ओळखून हटवण्याची कोणतीही व्यवस्था नाही का? हे अत्यंत घृणास्पद आहे. कुणीतरी सतत विषारी मजकूर पसरवत आहे.”
भविष्यातील डीपफेक आणि एआय सामग्रीवरही तत्काळ कारवाई
न्यायालयाने पुढे असेही नमूद केले की, भविष्यात गडकरी यांच्याबाबत याच स्वरूपाची डीपफेक किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) वापरून तयार केलेली सामग्री अपलोड झाल्यास, मंत्री थेट संबंधित सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी संपर्क साधू शकतात आणि कंपन्यांनी त्यावर त्वरित कारवाई करावी. या प्रकरणाची पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर ठेवण्यात आली असून, तोपर्यंत प्रतिवादींनी गडकरी यांच्या याचिकेवर आपली प्रतिज्ञापत्रे सादर करावीत, असे न्यायालयाने सांगितले.
गडकरींना सोशल मीडिया कंपन्यांविरोधात दावा दाखल करण्याची परवानगी
काही दिवसांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने मेटा, एक्स कॉर्प, गूगल एलएलसी आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मविरोधात दिवाणी दावा दाखल करण्याची परवानगी नितीन गडकरी यांना दिली होती. न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या एकलपीठाने गडकरींना अंतरिम दिलासा आणि तात्पुरत्या स्थगितीची मागणी करण्याची परवानगी दिली. ही याचिका त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या कथित मानहानीकारक पोस्ट आणि एआय-निर्मित डीपफेक सामग्रीविरोधात दाखल करण्यात आली होती. या सामग्रीमध्ये त्यांना इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल (ईबीपी) कार्यक्रम आणि ई20 उपक्रमाशी चुकीच्या पद्धतीने जोडण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
परवानगीशिवाय नाव आणि प्रतिमेचा वापर
अधिवक्ता संदीप एस. लड्डा यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, गडकरी यांच्याबाबतची मानहानीकारक सामग्री मेटा, एक्स कॉर्प आणि गूगलच्या मालकीच्या किंवा त्यांच्या नियंत्रणाखालील डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रकाशित, प्रसारित आणि सार्वजनिकरित्या उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचिकेनुसार, अज्ञात व्यक्तींनी एआय-आधारित डीपफेक, मॉर्फ केलेली, संपादित आणि बनावट ऑडिओ-व्हिडिओ सामग्री वापरून गडकरी यांचे नाव, प्रतिमा आणि व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्या माहितीशिवाय, संमतीशिवाय आणि परवानगीशिवाय वापर केला. यामध्ये त्यांना ई20 कार्यक्रमासाठी वैयक्तिकरित्या जबाबदार ठरवण्यात आले असून, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना या कार्यक्रमातून आर्थिक लाभ झाल्याचे खोटे आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला आणि व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांना अपूरणीय हानी पोहोचल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
E20 इंधनावरून वाद
E20 इंधन लागू झाल्यानंतर नितीन गडकरी यांच्यावर विरोधी पक्ष आणि काही ग्राहक संघटनांकडून सातत्याने टीका होत आहे. या संघटनांचा दावा आहे की 20 टक्के इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे जुन्या वाहनांच्या इंजिनचे नुकसान होऊ शकते आणि E20 साठी तयार नसलेल्या वाहनांसाठी ते योग्य नाही. मात्र, गडकरी यांनी वारंवार स्पष्ट केले आहे की, E20 इंधनामुळे इंजिनचे कोणतेही नुकसान होत नाही. वाहन उत्पादक, ऑटो कंपोनंट उद्योग आणि चाचणी संस्थांशी व्यापक सल्लामसलत आणि विविध चाचण्यांनंतरच हा कार्यक्रम तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.


















