‘नासाका’बाबतची बैठक निष्फळ; दीड तासाच्या चर्चेनंतरही तोडगा नाही, १७ सप्टेंबरला पुन्हा बैठक

नाशिक : नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या पुनरुज्जीवनाचा आणि शेतकरी-कामगारांच्या थकीत देणी भागविण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या कार्यालयात मंगळवारी (दि.१५) तातडीची बैठक घेण्यात आली. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे, शेतकरी, कामगार तसेच कारखान्याचे माजी पदाधिकारी उपस्थित असतानाही कारखाना भाडेतत्त्वावर चालविणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्याने बैठकीत अंतिम तोडगा निघू शकला नाही. तब्बल दीड तासाहून अधिक काळ चर्चा होऊनही बैठक निष्फळ ठरली.

९०० शेतकऱ्यांचे ३ कोटी ९० लाखांचे ऊस बिल थकीत

ChiniMandi WhatsApp Channel

बैठकीत शेतकरी, कामगार, कारखाना व्यवस्थापन आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कारखाना कृती समितीने शेतकरी आणि कामगारांच्या थकीत देणीचा अहवाल बैठकीसमोर मांडला.या अहवालानुसार, मागील गळीत हंगामातील सुमारे ९०० शेतकऱ्यांचे ३ कोटी ९० लाख रुपयांचे ऊस बिल अद्याप अदा झालेले नाही. त्याचबरोबर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे पाच महिन्यांचे सुमारे १ कोटी ५० लाख रुपये वेतन थकीत आहे. त्यामुळे शेतकरी आणि कामगार दोन्ही घटक आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

सहा महिन्यांपासून वीजपुरवठा बंद

कारखान्याचे सुमारे १५ लाख रुपयांचे वीज बिल थकीत असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून वीजपुरवठा खंडित आहे. परिणामी कारखाना परिसरात अंधाराचे वातावरण आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत यंत्रसामग्री, लोखंडी साहित्य तसेच अन्य मालमत्तेची चोरी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे कारखान्याच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

बँकेचे कोट्यवधींचे कर्ज थकीत

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कारखान्यावर मुद्दल आणि व्याजासह कोट्यवधी रुपयांचे कर्ज थकीत असल्याची बाबही बैठकीत समोर आली. कर्जवसुलीसाठी बँकेने सरफेसी कायद्यान्वये कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.एका बाजूला शेतकरी आणि कामगारांची थकीत देणी, तर दुसऱ्या बाजूला बँकेच्या कर्जवसुलीचा दबाव, अशा दुहेरी आर्थिक कोंडीत कारखाना अडकला आहे.

साखर, मोलॅसिसच्या विक्रीचा मुद्दा चर्चेत

कारखाना भाडेतत्त्वावर चालविणाऱ्या अष्टलक्ष्मी शुगर इथेनॉल अॅण्ड एनर्जी लिमिटेड या संस्थेकडून कारखान्यातील तयार साखर, मोलॅसिस, भुसा आणि राख यांची विक्री करण्यात आल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला.या विक्रीतून मिळालेल्या रकमेतून शेतकरी आणि कामगारांची थकीत देणी भागविण्यात आली नसल्याची बाब कारखाना कृती समितीने बैठकीत मांडली. तसेच करारातील अटींचा भंग झाल्याच्या कारणावरून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने संबंधित संस्थेला करारनामा रद्द करण्याची कायदेशीर नोटीस बजावल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

१७ सप्टेंबरला पुन्हा विशेष बैठक

कारखाना भाडेतत्त्वावर चालविणाऱ्या संस्थेचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित नसल्याने खासदार राजाभाऊ वाजे आणि खासदार भास्कर भगरे यांनी नाराजी व्यक्त केली. शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न अधिक काळ प्रलंबित ठेवता येणार नाहीत. तसेच कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सर्व संबंधित घटकांनी चर्चेत प्रत्यक्ष सहभागी होणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.या पार्श्वभूमीवर अंतिम तोडगा काढण्यासाठी १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा विशेष बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला भाडेधारक संस्थेने उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.या बैठकीत शेतकरी-कामगारांची थकीत देणी, वीजपुरवठा, बँकेची कर्जवसुली तसेच आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर कारखाना सुरू करण्याबाबत ठोस निर्णय होतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here