कोल्हापूर : साखर उद्योग हंगामी उद्योग आहे. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. कारखान्यांच्या या आर्थिक संकटामुळे तेथे वर्षानुवर्षे सेवा बजावणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे राज्यातील सहकारी साखर कारखान्यांत कार्यरत कर्मचाऱ्यांचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत समावेश करावा, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत केली.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार नरके यांनी राज्यातील साखर कारखानदारी आणि त्यातील कर्मचाऱ्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, साखर कारखान्यातील कामगारांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी कर्जाचा बोजा सहन करावा लागत आहे. पगार वेळेवर मिळत नसल्याने स्थिती बिकट झाली आहे. कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. अशा बिकट परिस्थितीत या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक दिलासा देणे गरजेचे आहे.


















