कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६-२७ गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन पार पडला. कारखान्याचे संचालक धीरज उलपे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते तसेच कारखान्याचे संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी कार्यक्रम झाला. महाडिक म्हणाले, कारखान्यामार्फत शासनाच्या मान्यतेने १८.५ मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प तसेच अत्याधुनिक मशिनरी आधुनिकीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते ते पूर्ण झाले आहे. कारखान्याकडे असणारी अपुरी जागा, नवीन मशिनरी आणणे व पुन्हा ती उभी करणे यामुळे कामाला काहीसा विलंब झाला. मात्र, आगामी गळीत हंगामात कारखान्याचे आधुनिकीकरण पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ते म्हणाले, आधुनिकीकरणामुळे कारखान्याला अधिक गाळप करता येणार असून उत्पादनामध्येही वाढ होण्यास मदत होणार आहे. याचा फायदा कारखान्याशी संबंधित सभासद व शेतकऱ्यांना होणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन आमदार अमल महाडिक यांनी सांगितले. कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी कारखान्याचे माजी चेअरमन गोविंदा चौगुले, संचालक व कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस तसेच वसंतदादा ऊसतोडणी वाहतूक संस्थेचे आणि श्री छत्रपती राजाराम नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी, शेतकरी सभासद, अधिकारी-कर्मचारी, ऊसतोडणी वाहतूक, कंत्राटदार उपस्थित होते.


















