मान्सून आणि खरीप पेरणीमुळे जून-ऑगस्टमध्ये वाहन विक्रीला मिळेल चालना : वाहन विक्रेत्यांचा आत्मविश्वास

नवी दिल्ली: फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन्स (FADA) च्या मे महिन्यातील विक्री सर्वेक्षणानुसार, जून ते ऑगस्ट 2026 या कालावधीत वाहन विक्रीत वाढ होईल, असा विश्वास 59 टक्के वाहन विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे. एप्रिल 2026 मध्ये हा आकडा 50.9 टक्के होता. ब्रोकरेज संस्था एमके ग्लोबलच्या मते, खरीप पेरणीला वेग येणे आणि मान्सूनचा चांगला प्रभाव यामुळे ग्रामीण भागातील उत्पन्न वाढण्याची अपेक्षा असून त्याचा थेट फायदा वाहन विक्रीला होणार आहे.

जून 2026 साठीचा दृष्टिकोनही सावध आशावादी आहे. सुमारे 50.5 टक्के डीलर्सना विक्री वाढण्याची अपेक्षा आहे, तर 39.9 टक्के डीलर्सना बाजार स्थिर राहील, असे वाटते. केवळ 9.6 टक्के डीलर्सनी विक्रीत घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. कच्च्या मालाच्या वाढत्या किमती चिंतेचा विषय असल्या तरी ग्रामीण भागातील रोख प्रवाह वाहन बाजाराला आधार देईल, असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel

प्रतिकूल परिस्थितीतही वाहन विक्रीत 9.6 टक्के वाढ

मे महिन्यात उष्णतेची लाट, इंधन दरांतील बदल आणि पश्चिम आशियातील तणावामुळे मालवाहतुकीवरील परिणाम अशा आव्हानांनंतरही किरकोळ वाहन विक्रीत वार्षिक 9.6 टक्के वाढ नोंदवली गेली. प्रवासी वाहने आणि दुचाकींच्या विक्रीत मोठी वाढ झाल्यामुळे हा सकारात्मक कल दिसून आला, तर व्यावसायिक वाहनांची वाढ तुलनेने मंद राहिली.

प्रवासी वाहनांच्या विक्रीत सर्वाधिक वाढ…

प्रवासी वाहनांच्या विक्रीत वार्षिक 23 टक्के वाढ झाली. ग्रामीण भागातील विक्रीत 30.4 टक्के वाढ झाली, तर शहरी भागात ही वाढ 19 टक्के होती. लहान कारची वाढती मागणी, एसयूव्ही वाहनांकडे सुरू असलेला कल, ग्रामीण उत्पन्नातील सुधारणा, नवीन मॉडेल्सचे लाँचिंग आणि सुलभ वित्तपुरवठा यामुळे ही वाढ झाली. इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांचा बाजारातील हिस्सा गेल्या वर्षीच्या 4.5 टक्क्यांवरून वाढून 6.5 टक्के झाला. मात्र, डीलर्सकडे असलेला वाहन साठा मे महिन्यात 31 ते 33 दिवसांपर्यंत वाढला असून तो FADA च्या 21 दिवसांच्या आदर्श पातळीपेक्षा जास्त आहे.

दुचाकी विक्रीतही वाढ…

तीव्र उष्णतेमुळे ग्राहकांची शोरूममध्ये येण्याची संख्या कमी झाली आणि काही मॉडेल्सच्या पुरवठ्यात अडचणी आल्या तरीही दुचाकी विक्रीत 7.5 टक्के वाढ झाली. लग्नसराईचा हंगाम आणि जीएसटी 2.0 मुळे वाहनांची परवड वाढल्याने मागणीला चालना मिळाली.इंधन दरांतील वाढ हा महत्त्वाचा घटक ठरला. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकींची बाजारातील हिस्सेदारी मे 2025 मधील 6.1 टक्क्यांवरून मे 2026 मध्ये 9.3 टक्क्यांपर्यंत पोहोचली. ग्राहकांचा कल इंधन बचत करणाऱ्या आणि पर्यायी ऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांकडे वाढला.

व्यावसायिक वाहनांना ग्रामीण बाजाराचा आधार…

व्यावसायिक वाहनांच्या विक्रीत 5.3 टक्के वाढ झाली. ग्रामीण भागात ही वाढ 8.1 टक्के होती, तर शहरी भागात 2.6 टक्के होती. लास्ट-माईल ई-कॉमर्स वितरण आणि जुन्या वाहनांच्या बदलामुळे हलक्या व्यावसायिक वाहनांच्या (LCV) विक्रीत 7.7 टक्के वाढ झाली.मध्यम आणि जड व्यावसायिक वाहनांच्या (MHCV) विक्रीत मात्र मर्यादित वाढ झाली. मालवाहतूक दर आणि पश्चिम आशियातील संकटाबाबत स्पष्टता येण्याची प्रतीक्षा फ्लीट ऑपरेटर करत आहेत.

ट्रॅक्टर विक्रीत वाढ, बांधकाम उपकरणांची मागणी घटली

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेती अर्थव्यवस्था मजबूत राहिल्यामुळे ट्रॅक्टर विक्रीत 11.2 टक्के वाढ झाली. मात्र, चाकांवरील बांधकाम उपकरणांच्या विक्रीत 17.5 टक्के घट नोंदवली गेली. एमके ग्लोबलच्या मते, कच्च्या मालाच्या किमतींवरील दबाव लक्षात घेता प्रवासी वाहनांपेक्षा दुचाकी आणि व्यावसायिक वाहन क्षेत्र अधिक आकर्षक ठरू शकते. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आणि विक्री वाढीच्या अधिक संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. (एएनआय)

Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here