नाशिक : केंद्र शासनाच्या नियमानुसार कादवा सहकारी साखर कारखान्याने २०२५-२६ च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन २ हजार ९६१ रुपये एफआरपी निश्चित करण्यात आली होती. कारखान्याने यापूर्वी शेतकऱ्यांना प्रतिटन २ हजार ९०० रुपये ऊस बिल अदा केले होते. आता अंतिम ऊस बिलापोटी प्रतिटन ३ हजार रुपये दराने रक्कम अदा केली आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून व्यवस्थापनाने एफआरपीतील उर्वरित ६१ रुपये तसेच अतिरिक्त ३९ रुपये, असे एकूण १०० रुपये प्रतिटन वाढीव दर देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती देण्यात आली.
कादवा कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत असून, कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. कारखान्याची गाळप क्षमता २,५०० टीसीडीवरून ३,५०० टीसीडी करण्याचे विस्तारीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. कारखान्याने २०२५-२६ च्या गळीत हंगामात ३,२८,१६३ मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. यावेळी ११.७८ टक्के साखर उताऱ्यासह ३,८६,३०० साखर पोत्यांचे उत्पादन झाले. आगामी हंगामासाठी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे व संचालक मंडळाने केले आहे. दरम्यान, कारखान्याच्या विस्तारीकरण काम वेगात सुरू आहे. या कामाची पाहणी मंत्री नरहरी झिरवाळ आणि खासदार भास्कर भगरे यांनी केली. कारखान्याच्या प्रगतीसाठी सहकार्य केले जाईल असे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.


















