नाशिक : ‘वसाका’ कारखान्याच्या कार्यस्थळावर कोट्यवधींची मालमत्ता धूळखात पडून, सुरक्षेचा प्रश्न गंभीर

नाशिक : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना (वसाका) परिसरातून अलीकडेच इलेक्ट्रिक वेल्डिंग मशीन चोरीला गेल्याची घटना घडली. यापूर्वी शेतकरी निवासातील खोल्यांची कुलुपे तोडून तेथील फर्निचर, गाद्या व इतर साहित्य लंपास करण्यात आले होते. तसेच १७ केव्हीए क्षमतेच्या जनित्रातील हजारो लिटर किमतीचे ऑइल होजपाईपच्या साहाय्याने काढून नेण्यात आले होते. कारखाना गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. कारखाना, आसवनी प्रकल्प आणि सहवीज निर्मिती प्रकल्पासह सुमारे ४५० ते ५०० कोटी रुपयांची मालमत्ता सध्या धूळ खात पडली आहे. शिखर बँकेने थकीत कर्जवसुलीसाठी कारखान्याची मालमत्ता जप्त केली आहे. कारखाना बंद असल्याने आणि सुरक्षेसाठी अपुरी मनुष्यबळ व्यवस्था असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

कारखाना कार्यस्थळावर सध्या तीन युनिट्स व इतर यंत्रणांच्या सुरक्षेसाठी एका शिफ्टमध्ये केवळ तीन ते चार सुरक्षा कर्मचारी कार्यरत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कोट्यवधींच्या मालमत्तेला धोका निर्माण झाला असून, कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाने तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केली. कारखान्याच्या भिंतीला भगदाड पाडून चोरीच्या घटना घडल्याने परिसरातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन वर्षांपूर्वी सहवीज प्रकल्पातील महाकाय ट्रान्सफॉर्मरमधील तेल चोरीला गेले होते. कारखान्याच्या पश्चिमेकडील दगडी भिंतीला भगदाड पाडून लाखो रुपये किमतीच्या विद्युत मोटारी, पितळी व लोखंडी व्हॉल्व्ह चोरण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रकार समोर आले होते. हे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here