नवी दिल्ली: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (NFCSF) केंद्र सरकारकडे मागणी केली आहे की, साखर कारखान्यांमध्ये करण्यात आलेल्या प्रत्यक्ष (फिजिकल) पडताळणीनंतर उपलब्ध साखर साठ्याची अंदाजित आकडेवारी तातडीने जाहीर करावी. महासंघाचे म्हणणे आहे की, यामुळे बाजारातील साखर तुटवड्याच्या अफवांना आळा बसेल आणि अलीकडील साखरेच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
NFCSF चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले की, बाजारातील सर्व घटकांना साखर पुरवठ्यात तूट निर्माण होण्याची शक्यता आधीच माहीत आहे. मंजूर विक्री कोट्यापेक्षा जास्त प्रमाणात साखर विक्री (ओव्हरसेलिंग) झाल्यामुळेही दरांवर अतिरिक्त दबाव निर्माण झाला आहे. मात्र, सरकारने साठा मर्यादा लागू केल्यानंतर घाऊक बाजारातील साखरेचा दर सुमारे ४८ रुपयांवरून ४६ रुपये प्रति किलोपर्यंत खाली आल्याचे त्यांनी नमूद केले.त्यांनी म्हटले कि, साखरेची संभाव्य टंचाई ग्राहक, उत्पादक, शेतकरी, व्यापारी आणि सरकार या सर्वांना माहीत आहे. सुपर एल निनोचा ऊस पिकावर होणारा संभाव्य परिणाम हा देखील एक महत्त्वाचा घटक आहे. त्याशिवाय, कोट्यापेक्षा जास्त विक्रीमुळेही बाजार अस्थिर झाला आहे.
किरकोळ आणि घाऊक बाजारात साखरेच्या दरात मोठी वाढ
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या एका महिन्यात देशभरात किरकोळ बाजारात साखरेच्या दरात ८ टक्के, तर घाऊक बाजारात ७ टक्के वाढ झाली आहे. दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (NCR) अनेक भागांमध्ये साखरेचा दर ४६-४८ रुपयांवरून ५५-५६ रुपये प्रति किलोपर्यंत वाढला आहे. तर १२ ऑगस्ट रोजी दिल्लीतील अधिकृत सरासरी दर ४९ रुपये प्रति किलो नोंदविण्यात आला. नाईकनवरे यांनी या वाढीला “अनैसर्गिक उसळी” असे संबोधले आणि आगामी काही महिन्यांत दर वाढणे अपेक्षित असले तरी सध्याच्या वेगाने वाढ होणे सामान्य नसल्याचे ते म्हणाले.
साठा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आकडेवारी जाहीर करण्याची मागणी
केंद्र सरकारने २४ जुलै रोजी देशातील सर्व साखर कारखान्यांमधील साखर साठ्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश दिले होते. ही प्रक्रिया १४ ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. तसेच, २८ जुलै रोजी सरकारने व्यापाऱ्यांसाठी एका वेळी जास्तीत जास्त ४०० टन साखर साठवण्याची मर्यादा लागू केली असून ती ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे. नाईकनवरे यांनी स्पष्ट केले की, पडताळणी पूर्ण होताच सरकारने अधिकृत साखर साठ्याची आकडेवारी सार्वजनिक करावी. ते म्हणाले, पुढील आठवड्यापासून सरकार साखर साठ्याचा अधिकृत आकडा जाहीर करू शकते. अफवा आणि सट्टेबाजी टाळण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
नोव्हेंबरमध्ये साखरेचा पुरवठा अधिक तंग होण्याची शक्यता
केंद्र सरकारने साखर कारखान्यांना ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच गाळप हंगाम सुरू करण्याची विनंती केली आहे, जेणेकरून सुमारे १५ लाख टन साखरेचे उत्पादन होऊ शकेल. साधारणपणे या कालावधीत सुमारे ५ लाख टन साखर उत्पादित होते. मात्र, उसाचा साखर उतारा (रिकव्हरी) कमी असल्याचे कारण देत कारखान्यांनी लवकर गाळप सुरू करण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन (इन्सेन्टिव्ह) देण्याची मागणी केली आहे.
नाईकनवरे यांच्या मते, चालू हंगामात देशाचे निव्वळ साखर उत्पादन सुमारे २७९ लाख टन राहण्याचा अंदाज आहे, जे ऑक्टोबरमधील सुमारे २४ लाख टन मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसे आहे. मात्र, नोव्हेंबरमध्ये साखरेचा पुरवठा अधिक तंग होऊ शकतो. ते म्हणाले की, कर्नाटकातील कारखाने सामान्यतः लवकर गाळप सुरू करतात. इतर राज्यांतील कारखान्यांनीही १५ ऑक्टोबरपासून गाळप सुरू केल्यास, नवीन उत्पादन आणि मागील हंगामातील शिल्लक साठ्याच्या मदतीने नोव्हेंबरमधील मागणी पूर्ण करता येईल. डिसेंबरपासून नवीन हंगामातील साखर मोठ्या प्रमाणावर बाजारात येऊ लागल्याने पुरवठ्यात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
एथेनॉलसाठी साखर वळवण्यावर निर्बंध येण्याची शक्यता
नाईकनवरे यांनी सांगितले की, साठा पडताळणी पूर्ण झाल्यानंतर केंद्र सरकारचे पहिले पाऊल साखरेचे एथेनॉल उत्पादनाकडे वळवणे (डायव्हर्जन) नियंत्रित करणे असू शकते, कारण देशांतर्गत बाजारात पुरेशी साखर उपलब्ध ठेवणे हे सरकारचे प्रमुख प्राधान्य आहे.
चालू ऑक्टोबर-सप्टेंबर हंगामात सुमारे २४ लाख टन साखर एथेनॉल उत्पादनासाठी वळवली जाण्याचा अंदाज आहे, तर २०२४-२५ मध्ये हा आकडा ३४ लाख टन होता. उद्योग तज्ज्ञांच्या मते, जर देशांतर्गत साखर पुरवठा तंग राहिला, तर २०२६-२७ हंगामात जैवइंधनासाठी साखर वळवण्याची शक्यता अत्यंत मर्यादित राहील.
उद्योग क्षेत्रातील नेत्यांनी सरकारला विनंती केली आहे की, जर ऊसाचा रस किंवा बी-हेवी मळीपासून (B-heavy molasses) एथेनॉल उत्पादनावर निर्बंध आणण्याचा विचार असेल, तर त्याची पूर्वसूचना कारखान्यांना द्यावी. याबाबत ऑगस्ट अखेरीस घोषणा होण्याची शक्यता आहे. उल्लेखनीय म्हणजे, एथेनॉल उत्पादनासाठी साखर वळवण्याचे प्रमाण २०२२-२३ मध्ये ४३ लाख टन, २०२३-२४ मध्ये २४ लाख टन, तर चालू हंगामात सुमारे २४ लाख टन इतके राहण्याचा अंदाज आहे.


















