इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये साखर कारखानदार आणि सरकारमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गाळप लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे, तर कारखानदारांनी साखरेच्या निर्यातीसाठी परवानगी मागितली आहे. मागील वर्षी साखर निर्यातीमुळे देशांतर्गत किमती वाढल्याचा अनुभव असल्याने पाकिस्तान सरकारने निर्यातीबाबत सावध भूमिका घेतली आहे. सध्या कारखानदारांना दोन लाख टन साखर निर्यात करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र, आणखी ११ लाख टन साखर निर्यातीची त्यांची मागणी आहे. पाकिस्तान सांख्यिकी विभागाच्या सर्वेक्षणानुसार, विविध शहरांमध्ये साखरेचा दर प्रतिकिलो १३० ते १५० पाकिस्तानी रुपयांच्या दरम्यान आहे. निर्यातीमुळे देशांतर्गत साखरेची उपलब्धता कमी होणे, त्यानंतर किमती वाढल्याने आयात करावी लागणे आणि आयात केलेल्या साखरेचा साठा शिल्लक राहणे, या चक्रामुळे सरकारवर आर्थिक भार पडला आहे.
याबाबत ‘डॉन’ वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ऊस गाळप हंगाम सुरू होण्यास होत असलेल्या विलंबामुळे शेतकरी नाराज आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये सध्या किरकोळ बाजारात साखरेचा सरासरी दर प्रतिकिलो १४० पाकिस्तानी रुपये (सुमारे ४७.६४ भारतीय रुपये) आहे. पाकिस्तानने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये पहिल्या ११ महिन्यांत सुमारे ७.६५ लाख टन साखर निर्यात केली. त्यातून ४११ दशलक्ष डॉलरचे परकी चलन मिळाले. मात्र, डिसेंबर २०२४ मध्ये प्रतिकिलो १२५ ते १३० पाकिस्तानी रुपये असलेला कारखानास्तरीय साखरेचा दर जून २०२५ पर्यंत देशातील बहुतांश भागांत किरकोळ बाजारात २०० पाकिस्तानी रुपयांवर पोहोचला. त्यामुळे सरकारने पाच लाख टन साखर आयात करण्याची योजना मंजूर केली. आता शिल्लक साठा असल्याने कारखानदार निर्यातीची मागणी करत आहेत. त्यांनी साखरेचा साठा विकला नसल्याचे सांगत आणि आर्थिक अडचणी असल्याचे कारण देत गाळप लांबणीवर टाकले आहे. परिणामी शेतकऱ्यांना फटका बसला आहे. दरम्यान, पाकिस्तानमधील साखर निर्यात-आयातीच्या पेचाचा भारतावर अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे.


















