परभणी : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत महामंडळामार्फत आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ऊसतोड कामगारांचे अधिकृत ओळखपत्र आवश्यक आहे. सानुग्रह अनुदान योजनेसह ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ मिळविण्यासाठीही ओळखपत्र महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र ऊसतोड कामगारांनी नियुक्त सर्वेक्षकांकडे नोंदणी करून ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. समाज कल्याणचे सहायक आयुक्त आर. एच. एडके म्हणाले की, ऊसतोड कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्वेक्षण, नोंदणी, ओळखपत्र वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या कामासाठी मे. स्मार्ट सर्व्हिसेस प्रा. लि., पुणे या संस्थेची नियुक्ती करण्यात आली असून, परभणी जिल्ह्यातील प्रत्येक गावासाठी सर्वेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, गावात येणाऱ्या नियुक्त सर्वेक्षकास ऊसतोडणी केलेल्या साखर कारखान्याचे नाव तसेच आवश्यक माहिती उपलब्ध करून देऊन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी. सतत तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ ऊसतोडणीचे काम केलेल्या कामगारांनी आपल्या गावातील ग्रामसेवकांकडून ऊसतोड कामगार असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करावे. पात्र कामगारांनी सर्वेक्षण व नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊन आवश्यक ओळखपत्र प्राप्त करून घ्यावे, समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयातील संबंधित शाखेचे कर्मचारी ए. एम. साखरे यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


















