नवी दिल्ली : शेतकऱ्यांना अनुदानित खतांचे वितरण अधिक सुलभ, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यासाठी केंद्र सरकारने पायलट प्रकल्प सुरू केला आहे. ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ या उपक्रमाची अंमलबजावणी २० राज्यांतील ४० जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने केली जात आहे, अशी माहिती शुक्रवारी संसदेत देण्यात आली.केंद्रीय रसायने व खते मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी लेखी उत्तरात सांगितले की, खत विभाग आणि कृषी व शेतकरी कल्याण विभाग संयुक्तपणे हा पायलट प्रकल्प राबवत आहेत.
या प्रस्तावित व्यवस्थेअंतर्गत शेतकरी किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी मोबाइल अॅपद्वारे नोंदणी करू शकतील. त्यांना आपल्या जमिनीची तसेच लागवड केलेल्या पिकाची माहिती भरून आवश्यक खताची आगाऊ नोंदणी करता येणार आहे. मंत्री नड्डा यांनी सांगितले की, या उपक्रमाचा पायलट प्रकल्प आतापर्यंत २० राज्यांतील ४० जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आला आहे.
देशभरात डीबीटी प्रणाली लागू
खत विभागाने तेलंगणासह संपूर्ण देशात अनुदानित खतांच्या विक्रीसाठी थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणाली लागू केली आहे. आधार प्रमाणीकरणाच्या आधारे शेतकऱ्यांना अनुदानित दरात खते उपलब्ध करून दिली जातात.२०२५-२६ या आर्थिक वर्षात देशभरातील सुमारे २.८७ लाख सक्रिय किरकोळ विक्रेत्यांच्या माध्यमातून ८.४ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण ७४६.५७ लाख मेट्रिक टन अनुदानित खतांची विक्री करण्यात आली. या कालावधीत केंद्र सरकारने २.१७ लाख कोटी रुपयांची खत अनुदानाची तरतूद केली.
खत विक्रीसाठी १०० टक्के आधार प्रमाणीकरण
अनुदानित खतांच्या विक्रीसाठी १०० टक्के आधार प्रमाणीकरण अनिवार्य असल्याचे नड्डा यांनी सांगितले. खतांचे समान वितरण सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक खरेदीदारासाठी दरमहा ५० पोत्यांची खरेदी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र, तेलंगणात प्रति खरेदीदार प्रति एकर दोन पोती युरियाची स्वतंत्र मर्यादा आहे. जम्मू-काश्मीरमध्ये एका हंगामात प्रति खरेदीदार ६० पोत्यांपर्यंत खते खरेदी करता येतात.
खत खरेदीशी संबंधित अहवालांच्या देखरेखीसाठी इंटिग्रेटेड फर्टिलायझर मॅनेजमेंट सिस्टम (iFMS) डॅशबोर्ड उपलब्ध आहेत. राज्यातील अधिकारी या डॅशबोर्डच्या माध्यमातून खरेदीवर लक्ष ठेवू शकतात. याशिवाय, २० राज्यांतील निवडक ४० जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ पायलट प्रकल्पांतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि लागवड केलेल्या पिकाच्या आधारे खते उपलब्ध करून दिली जात आहेत.

















