इथेनॉलला प्रोत्साहन: गोड ज्वारीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात वाढणार गोडवा

नवी दिल्ली : केंद्र सरकारने E-२० उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी इथेनॉल उत्पादन वाढविण्यास प्रोत्साहन दिले आहे आणि इथेनॉलसाठी पर्यायी फीडस्टॉक विकसित करण्याच्या प्रयत्नात उसासह गोड ज्वारी (स्वीट सोरघम) च्या आंतरपिकाला प्रोत्साहन दिले जात आहे. गोड ज्वारीची इथेनॉल मिश्रणासाठी मागणी वाढल्याने आणि आंतरपिकामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल. एकाच शेतात गोड ज्वारी आणि ऊस उत्पादन केल्याने शेतकऱ्याला अधिक उत्पन्न मिळण्यास मदत मिळेल. प्रती हेक्टर जमिनीपासून इथेनॉल उत्पादन वाढवणे शक्य होणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात प्रती हेक्टर ३५ टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. तर इथेनॉल उत्पादन क्षमतेत जवळपास ३० टक्क्यांची वाढ होवू शकते, असे म्हटले जात आहे.

मक्का, गोड ज्वारीची मागणी वाढली
सद्यस्थितीत भारताकडे १,०८२ कोटी लिटर इथेनॉल (निर्माणाधीन प्लांट सह) उत्पादन करण्याची क्षमता आहे. यापैकी ७२३ कोटी लिटर मोलॅसीसवर आधारित युनिट्सपासून आणि ३५९ कोटी लिटर धान्यावर आधारीत प्लांटपासून आहे. जर २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य गाठायचे असेल तर जवळपास १०१६ कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाची गरज आहे. इतर वापरासाठी ३३४ कोटी लिटर इथेनॉलची गरज भासेल. यासाठी जवळपास १७०० कोटी लिटर इथेनॉल उत्पादन क्षमतेच्या प्लांट्सची गरज भासेल. तर प्लांट ८० टक्के क्षमतेने काम करतील. २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रण उद्दिष्ट गाठण्यासाठी धान्यावर आधारित योजनांपासून इथेनॉलचे उत्पादन निम्मे होणे गरजेचे आहे. त्यामुळे आता मक्क्यासोबत ज्वारीच्या शेतीवर लक्ष केंद्रीत केले जात आहे.

NSI ची बलरामपूर आणि दालमिया भारतसोबत भागीदारी

नॅशनल शुगर इन्स्टिट्यूटने (NSI) इथेनॉल उत्पादन वाढविण्यासाठी पर्यायी फीडस्टॉक विकसित करण्याच्या प्रयत्नात गोड ज्वारीच्या (स्वीट सोरघम) च्या आंतरपिकाचे परिक्षण करण्यासाठी साखर उद्योग समूह, बलरामपूर शुगर मिल्स लिमिटेड आणि दालमिया भारत शुगर मिल्स लिमिटेडच्या सहकार्याने भागीदारी केली आहे. ऊस लागवडीच्या दोन सरींदरम्यान ऊस पिकासोबत गोड ज्वारीच्या पिकाची लागवड करून परिक्षण केले आहे. यामध्ये शुगर कंपन्यांच्या मदतीने गोंडा आणि शाहजहाँपूर जिल्ह्यात गोड ज्वारीची लागवड करण्यात येत आहे.

गोड ज्वारीच्या पाच प्रजातींचे परिक्षण
गोड ज्वारीच्या पाच प्रजातींचे CSH२२SS, SS७४, SS८४, फुले वसुंधरा आणि ICSSH२८ चे परिक्षण ICAR इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स रिसर्च, हैदराबादकडून करण्यात आले. त्यांनी गोड ज्वारीचे सरासरी उत्पादन ५०-५५ टन प्रती हेक्टर आणि इथेनॉल उत्पादन जवळपास ४५-५० लिटर प्रती मेट्रिक टन होईल असे संकेत दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here