कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊस वजनकाट्यांमधील तफावतीमुळे आर्थिक नुकसान होत असल्याबाबत आमदार सर्वश्री सदाशिव खोत, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, श्रीमती उमा खापरे, डॉ.परिणय फुके, श्रीमती चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ऊस वजन प्रक्रियेत पारदर्शकता व शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी साखर कारखान्यांच्या आवारात कॅलिब्रेटेड व ऑनलाईन (केंद्रीय सर्व्हरशी संलग्न) वजन काटा बसविणे या बाबींची व्यवहार्यता तपासणे विचाराधीन असल्याचे सभागृहाला सांगितले.
राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची साखर कारखान्यांच्या ऊस वजनकाट्यांव्दारे फसवणूक होऊन आर्थिक नुकसान होत असून, शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनाच्या नोंदीमध्ये खाजगी वजनकाट्यावर व साखर कारखान्याच्या वजनकाट्यावर तफावत येत असल्याबाबत आमदार खोत यांनी सोमवारी विधान परिषदेत सवाल उपस्थित केला होता.या प्रश्नाचे उत्तर देताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले कि, जानेवारी, २०२६ च्या शेवटच्या आठवड्यात वा त्या सुमारास खाजगी वजनकाट्यावर व साखर कारखान्याच्या वजनकाट्यावर नोंद झालेल्या वजनामध्ये तफावत आढळून येत असल्याबाबतची तक्रार या यंत्रणेत प्राप्त झालेली नाही.
मंत्री भुजबळ म्हणाले कि, खाजगी वजनकाटे व साखर कारखान्यांचे वजनकाटे हे दोनही वैध मापनशास्त्र विभागाकडून प्रमाणित करण्यात येतात. त्यासाठी नियमाप्रमाणे एकसमान कार्यपद्धत अवलंबिण्यात येते. त्यामुळे वैध मापनशास्त्र यंत्रणेकडून खाजगी वजन काट्यावर वजन केलेल्या ऊसाचे वजन ग्राह्य धरण्याबाबत साखर आयुक्त, पुणे यांना ०२/११/२०२२ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. त्यानुसार साखर आयुक्त पुणे यांनी त्यांच्या ०९/११/२०२२ च्या पत्रान्वये सर्व साखर कारखान्यांना खाजगी वाहन काट्यावर वजन केलेल्या ऊसाचे वजन ग्राह्य धरण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. तसेच ऊस वजन प्रक्रियेत पारदर्शकता व शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी साखर कारखान्यांच्या आवारात कॅलिब्रेटेड व ऑनलाईन (केंद्रीय सर्व्हरशी संलग्न) वजन काटा बसविणे या बाबींची व्यवहार्यता तपासणे विचाराधीन आहे.


















