पुणे : भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रक्रियेसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडे सभासद शेतकऱ्यांच्यावतीने सुमारे ४० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. ही रक्कम कोणत्याही राजकीय पक्षाकडून किंवा व्यक्तीकडून नव्हे, तर सभासद शेतकऱ्यांनी स्वेच्छेने एकत्रित करून जमा केली आहे, अशी माहिती माजी आमदार रमेश थोरात यांनी दिली. कारखान्याची निवडणूक होण्यासाठीच हा निधी उभारण्यात आला असून, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सभासदांशी चर्चा करून निवडणुकीच्या रिंगणात पॅनल उतरविण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. निवडणूक सभासद शेतकऱ्यांच्या पाठबळावर लढवून कारखाना सभासदांच्या मालकीचा कायम ठेवण्यासाठी पॅनल उभे केले जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. विद्यमान संचालक मंडळ निवडणूक घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
माजी आमदार थोरात म्हणाले की, कारखान्याच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शासनाने ३६ कोटी ९० लाख रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र, या कर्जाची अद्याप एक रुपयाचीही परतफेड झालेली नाही. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत २०२० मध्येच संपली आहे. त्यानंतरही निवडणूक घेण्यात आलेली नाही. कारखान्याच्या कारभाराबाबत सभासदांमध्ये अस्वस्थता आहे. गेल्या पंचवीस वर्षात कारखान्याची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस अडचणीची होत गेली आहे. कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी सभासदांच्या पाठबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
कारखाना लिक्विडेशनमध्ये काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही थोरात यांनी केला. त्यामुळे कारखान्याचे भवितव्य आणि सभासदांचे हित यासाठी आगामी निवडणूक महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्राथमिक मतदार यादीचा कार्यक्रम जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी डॉ. प्रगती बागल यांनी जाहीर केला आहे. प्राथमिक मतदार यादीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.


















