पुणे : भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यात मागील काळात साखरेच्या पोत्यांचा हिशेब लागत नसल्याच्या प्रकरणाची अखेर चौकशी होणार आहे. साखरेच्या ‘गायब’ पोत्यांप्रकरणी कलम ८३ अंतर्गत चौकशी करण्याचा ठराव कारखान्याच्या ६६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दरम्यान, सभेत सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांना उत्तर देताना कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी, “चुकीचे काही सापडले तर मला फाशी द्या; मात्र मोघम आरोप करू नका,” असे आव्हान दिले. कारखान्याची ६६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. २७) छत्रपती हायस्कूलच्या प्रांगणात अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सभेच्या सुरुवातीला जाचक यांनी कारखान्याच्या कामकाजाचा आढावा मांडला. मागील पाच ते सात वर्षांच्या तुलनेत गतहंगामात कारखान्याची रिकव्हरी वाढली असून, केवळ एका क्लिनिंगवर गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘टार्गेट’ करू नये
कारखान्याचे अधिकारी आणि कर्मचारी व्यवस्थित काम करत आहेत. त्यामुळे कोणत्याही कारणाशिवाय त्यांना लक्ष्य करू नये, असे आवाहन जाचक यांनी सभासदांना केले.कारखान्याची सध्याची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने यंदा दिवाळीच्या काळात सभासदांना पेमेंट देता येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, आगामी गळीत हंगामात परिसरातील इतर कारखान्यांच्या तुलनेत थोड्याफार फरकाने चांगला अॅडव्हान्स देण्याची ग्वाही त्यांनी दिली.कारखान्याला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार पार्थ पवार आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे सहकार्य मिळत असल्याचेही जाचक यांनी सांगितले.
पोटभाडेकरू ठेवणाऱ्या गाळेधारकांवर कारवाई
कारखान्याच्या मालकीच्या दुकान गाळ्यांच्या भाड्यात वाढ करण्यात आली असून, त्यातून कारखान्याला सुमारे ८० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याची माहिती सभेत देण्यात आली.मात्र, काही गाळेधारकांनी आपले गाळे पोटभाड्याने दिल्याचे निदर्शनास आले आहे. अशा गाळेधारकांवर कारवाई करण्याचा ठरावही सभेत मंजूर करण्यात आला. त्यामुळे गाळे पोटभाड्याने देणाऱ्या संबंधित गाळेधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सभासदांचा चर्चेत सहभाग
सभेस उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर, माजी अध्यक्ष प्रशांत काटे, अविनाश घोलप, कार्यकारी संचालक अशोक जाधव, मुख्य व्यवस्थापक हनुमंत करवर यांच्यासह आजी-माजी संचालक उपस्थित होते.यावेळी संचालक रामचंद्र निंबाळकर, भाजप नेते तानाजी थोरात, विशाल निंबाळकर, सतीश काटे, अमर कदम, शंकरराव रुपनवर, अॅड. संभाजी काटे, रवींद्र टकले, राजेंद्र सपकाळ, विशाल पाटील, उमेश सपकाळ, बाळासाहेब शिंदे, अमोल भोईटे, प्रशांत पवार यांच्यासह अनेक सभासदांनी चर्चेत सहभाग घेतला.


















