पुणे : यशवंत सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा २७ सप्टेंबर रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर यशवंत कारखाना कृती समितीच्या वतीने थेऊर फाटा येथील मॅजेस्टिक हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. कारखान्याने हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीशी केलेला जमीन व्यवहार तसेच २५ एकर जमिनीवरील कर्जाच्या नोंदीची चौकशी करावी, अशी मागणी कृती समितीने केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी विकास लवांडे यांच्यासह कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे, राजेंद्र चौधरी, लोकेश कानकाटे, सुरेश कामठे, राजेश कोतवाल, अर्जुन चौधरी, विठ्ठल हगवणे, रमेश कोतवाल, विजय कोतवाल, बाळकृष्ण कामठे आणि दीपक गावडे उपस्थित होते.
कृती समितीचे विकास लवांडे यांनी कारखान्याच्या जमीन व्यवहार आणि कारभारावरून यशवंत कृती समितीने प्रश्न उपस्थित केले आहेत. जमीन विक्रीचा दर, मृत सभासदांच्या हजेरीपत्रकावरील कथित बोगस सह्या, बोगस प्रोसिडिंग, बोगस अहवाल, बोगस रेकॉर्ड आणि बोगस वार्षिक सर्वसाधारण सभा असा ‘पॅटर्न’ हवेली तालुक्यात आला तालुक्यात आहे, असा आरोप केला. सहकार मंत्री आणि साखर आयुक्त संचालक मंडळाला पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीने कोरेगाव मूळ येथील जमीन प्रति एकर पाच कोटी रुपये दराने घेतली असताना यशवंत कारखान्याची जमीन कमी दराने का विकण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हजेरी पत्रकावर मृत सभासदांच्या कथित बोगस सह्या दाखविण्यात आल्याचा आरोप कृती समितीने केला. या प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार केल्याचे आणि अद्याप गुन्हा दाखल झालेला नसल्याचे लवांडे यांनी सांगितले. राजेंद्र चौधरी, माजी संचालक पांडुरंग काळे यांनी संचालक मंडळाच्या कारभाराविषयी विविध प्रश्न उपस्थित केले.


















