पुणे : बारामती तालुक्यात शेतीच्या मशागतीला वेग, उसाचे पाचट कुजविण्यावर शेतकऱ्यांचा भर

पुणे : बारामती तालुक्यात सध्या शेती मशागतीला वेग आला असून वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे शेतकरी सकाळी सायंकाळीच शेतातील कामे उरकत आहेत. गाळप हंगाम संपल्याने ऊस शेतीतील कामांनाही वेग आला असून, उसाचे पाचट कुजविण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. मशागतीसाठी लागणाऱ्या यांत्रिक कामाचे दरही निश्चित पातळीवर आहेत. नांगरणीसाठी प्रति एकर सुमारे ३ हजार ५०० रुपये, काकर मारण्यासाठी २ हजार रुपये, रोटा वेटरसाठी २ हजार २०० रुपये, तर पेरणी व सरी काढण्यासाठी सुमारे २ हजार रुपये दर आकारले जात आहेत. ट्रॅक्टर व बैलांच्या साहाय्याने उसाची बांधणी सुरू आहे. यासाठी ४ हजार रुपये प्रति एकर दर आकारला जात आहे.

सध्या उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने शेतकरी सकाळी आणि सायंकाळी कामांना प्राधान्य देत आहेत. नांगरणी, काकर मारणे, रोटावेटर, पाचटकुट्टी, शेणखत टाकणे, उसाची बांधणीसह कामे यांत्रिकीकरणासह पारंपरिक साधनांच्या मदतीने वेगाने सुरू आहेत. गहू व हरभरा पिकांची काढणी पूर्ण झाली असून भाजीपाला आणि चाऱ्याची पिकेही आहेत. मशागतीचे दर काही वर्षांपासून स्थिर असल्याने थोडाफार दिलासा मिळत आहे. मात्र, महिनाभरात इंधनाचे भाव वाढणार असल्याने शेतकरी मेटाकुटीला येणार आहे. बारामती तालुक्यात पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. पुढील महिनाभर प्रचंड उष्णता राहणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. रब्बी हंगामातील पिकांची काढणी व मळणी पूर्ण झाल्यानंतर शेतकरी आता जमिनीची मशागत करण्याकडे वळले आहेत.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here