पुणे : येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामार्फत सभासद व ऊस उत्पादकांना दरवर्षीप्रमाणे दिपावलीनिमित्त गाव व गटवार साखर वाटपाचे नियोजन केले आहे. दि. २ ते १० ऑक्टोबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत २० रुपये प्रति किलो दराने गावोगावी साखर वाटप करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली. राज्याचे माजी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे मार्गदर्शनानुसार पूर्ण शेअर्स (रक्कम रु. १५,०००) व ऊस पुरवठा केलेले ८० किलो, फक्त पूर्ण शेअर्स भरलेल्यांना ५० किलो, अपूर्ण शेअर्स रक्कम व ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना ४० किलो, फक्त ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना ४० किलो, फक्त अपूर्ण शेअर्स रक्कम जमा केलेले ३० किलोप्रमाणे विभागीय शेतकी गटांतर्गत गावोगावी १०, २० व ५० किलो पॅकींगमध्ये साखर वाटपाचे नियोजन आहे असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष बेंडे व उपाध्यक्ष प्रदीप वळसे-पाटील यांनी सांगितले की, जे सभासद, ऊस उत्पादक नियोजीत कालावधीत साखर घेवू शकणार नाहीत त्यांना दि. ११ ते १४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये कारखाना साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत वाटप केली जाणार आहे. राहिलेल्या सभासद व ऊस उत्पादकांना सप्टेंबर २०२७ पर्यंत प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी साईटवर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत साखर वाटप करण्यात येणार आहे. कारखान्यामार्फत मागील वर्षी सभासदांसाठी स्मार्ट साखर कार्ड विभागीय शेतकी कार्यालयामध्ये वाटप केलेली आहेत. हंगाम २०२५-२६ मध्ये ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादकांसाठी साखर कार्ड वाटपाचे काम संबंधित विभागीय शेतकी गट ऑफिसला चालू आहे. नियोजित साखर वाटप तारखेला साखर घेताना सभासद व ऊस उत्पादकांनी त्यांना दिलेले स्मार्ट कार्ड व ओळखीचा पुरावा सोबत आणणे आवश्यक आहे. या सवलतीमधील साखरेचा सभासद व ऊस उत्पादकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी केले.


















