पुणे : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची निवड गुरुवारी (ता. ५) होणार आहे. अध्यक्ष निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाल्याने इच्छुक संचालकांच्या हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने कारखान्याच्या निवडणुकीत २१ पैकी सर्व २१ जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदाची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार, याबाबत पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील सहकार व राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पार पडलेल्या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘श्री सोमेश्वर विकास पुरुष अजितदादा पवार विकास पॅनेल’ने एकतर्फी विजय मिळवला. या विजयानंतर अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा सुरू झाली आहे. अध्यक्ष निवडीचे अंतिम अधिकार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे असल्याने त्यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही निवड केवळ कारखान्याच्या प्रशासकीय कारभारापुरती मर्यादित नसून २०२९ च्या विधानसभा निवडणुकीतील राजकीय समीकरणांवरही परिणाम करणारी ठरू शकते, अशी चर्चा आहे. खासदार पार्थ पवार यांची युवा नेतृत्वाला संधी देण्याची भूमिका, सुनेत्रा पवार यांचे राजकीय गणित, सामाजिक समतोल आणि सहकार क्षेत्रातील अनुभव या सर्व बाबींचा विचार अध्यक्ष निवडीत होण्याची शक्यता आहे.
गुरुवारी (ता. ५) सोमेश्वर मुख्य कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयातील जिजाऊ सभागृहात अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व जागांवर विजय मिळवलेल्या सत्ताधारी पॅनेलसमोर आता अध्यक्षपदासाठी योग्य चेहरा निश्चित करण्याचे आव्हान आहे. अनुभवी नेतृत्वाला संधी मिळणार, युवा संचालकाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार की ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देऊन नवा राजकीय संदेश दिला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजवर्धन शिंदे, प्रमोद काकडे यांच्या नावांची चर्चा
अध्यक्षपदाच्या शर्यतीत कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. कारखान्याचे अध्यक्षपद भूषविल्यामुळे त्यांना सहकार क्षेत्रातील कामकाजाचा अनुभव आहे. तसेच बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.माजी संचालक, दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांचे नावही अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. सहकार क्षेत्रातील अनुभव, प्रशासकीय कामकाजावरील पकड आणि व्यापक जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.
सुनेत्रा पवार यांचा कौल कोणाला? युवा संचालकही शर्यतीत
अध्यक्षपदासाठी दुसऱ्या टर्ममध्ये निवडून आलेले युवा संचालक अभिजीत काकडे आणि ऋषिकेश गायकवाड यांचीही नावे चर्चेत आहेत. बारामती खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष विक्रम भोसले यांच्याही नावाला काही संचालकांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे. पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उत्तम धुमाळ यांचे नावही आता चर्चेत आले आहे.
खासदार पार्थ पवार यांच्या युवा नेतृत्वाला प्राधान्य देण्याच्या भूमिकेमुळे तरुण संचालकाला अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मात्र, अंतिम निर्णय सुनेत्रा पवार यांचाच असल्याने अनुभव, सामाजिक समतोल आणि आगामी राजकीय समीकरणांचा विचार करूनच अध्यक्षपदाचा चेहरा निश्चित केला जाईल, असे जाणकारांचे मत आहे.


















