पुणे : गळीत हंगाम संपल्यानंतर ९० दिवसांच्या आत जर एफआरपी दिली नाही, तर संबंधित साखर कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, जनरल मॅनेजर आणि संचालक मंडळ यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याची कायदेशीर परवानगी देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य ऊसदर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रा. सुहास पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी नुकतीच राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांना निवेदन दिले आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत एफआरपीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर, प्रस्तावित ‘साखर ऊस नियंत्रण कायदा-२०२६’ मध्ये अत्यंत कठोर तरतुदींचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
पाटील यांनी केंद्र सरकारने रिकव्हरी बेस ८.५ रून १०.२५ पर्यंत वाढवल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे केंद्राने हा बेस पुन्हा ८.५ टक्के करावा अशी मागणी केली. एफआरपीमधून कपात केल्या जाणाऱ्या तोडणी आणि वाहतूक खर्चासाठी संपूर्ण राज्यस्तरावर समान दर निश्चित करावा, एफआरपी देण्यास उशीर झाल्यास प्रचलित नियमाप्रमाणे १५ टक्के व्याज देण्याची तरतूद काटेकोरपणे राबवावी, थकीत देणी वसुलीसाठी जिल्हाधिकारी आणि महसूल यंत्रणेला ९० ते १०० दिवसांची स्पष्ट वेळमर्यादा देण्यात यावी, साखर उत्पादन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी साखर आयुक्तालयाने बंधनकारक नियम करावेत, आदी मागण्यांचा यामध्ये समावेश आहे.


















