पुणे : बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी गटातील नाराजांसह विरोधक आणि अनेक इच्छुक अपक्ष उमेदवारांनीही निवडणुकीची तयारी सुरू केल्याने यंदाची निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे. उमेदवारांची संख्या वाढल्यास मतांचे विभाजन होण्याची शक्यता असल्याने त्याचा फटका नेमका कोणाला बसणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. सोमेश्वर कारखान्यावर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. मात्र, यंदा विरोधकांकडून वाढलेली तयारी आणि सत्ताधारी गटातील संभाव्य नाराजी यामुळे सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत प्रथमच जिरायत-बागायत आणि सिंचनाचा प्रश्न प्रचाराच्या केंद्रस्थानी येण्याची चिन्हे आहेत.
पवार कुटुंबाच्या वर्चस्वानंतर प्रथमच वेगळे राजकीय चित्र
सोमेश्वर कारखान्याच्या प्रगतीसाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत. अनेक वर्षांपासून कारखान्यावर पवार कुटुंबाचे वर्चस्व राहिले आहे. मात्र, अजित पवार यांच्या अनुपस्थितीत प्रथमच ही निवडणूक होत असल्याने कारखान्याच्या राजकारणातील बदलत्या समीकरणांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी गटाकडून कारखान्याने केलेली विकासकामे, आर्थिक प्रगती आणि आतापर्यंतची कामगिरी सभासदांसमोर मांडली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विरोधकांकडून कारभारातील त्रुटी, सभासदांच्या प्रलंबित मागण्या तसेच स्थानिक पातळीवरील नाराजीचे मुद्दे प्रचारात पुढे केले जाण्याची शक्यता आहे. यंदा विरोधकांची संख्या वाढल्याचे चित्र असून, अनेक इच्छुक उमेदवार ‘आता नाही तर कधीच नाही’ या भूमिकेतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.
अपक्ष उमेदवारांची वाढती संख्या ठरणार डोकेदुखी?
विरोधकांसोबतच अपक्ष उमेदवारांची वाढती संख्या सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही गटांसाठी डोकेदुखी ठरू शकते. अनेक इच्छुकांनी सभासदांशी वैयक्तिक संपर्क सुरू केल्याची चर्चा आहे. गावागावातील गट-तट, स्थानिक राजकीय समीकरणे आणि वैयक्तिक संबंधांचा निवडणूक निकालावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बहुतांश भाग जिरायत पट्ट्यात येतो. गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील सिंचनाचा प्रश्न प्रलंबित असल्याची भावना अनेक शेतकरी सभासद व्यक्त करीत आहेत. त्यामुळे जिरायत-बागायत, सिंचन आणि पाण्याचा प्रश्न यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरण्याची शक्यता जाणकार सभासदांकडून व्यक्त होत आहे.
बंडखोरीवर ठरणार निवडणुकीचे समीकरण
निवडणुकीचे अंतिम चित्र उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. कोणत्या गटाकडून कोण मैदानात उतरतो, कोणाचे पॅनेल तयार होते आणि संभाव्य बंडखोरीला कितपत आळा घालता येतो, यावर निवडणुकीचे समीकरण मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. पक्षनिष्ठेपेक्षा सभासदांच्या प्रश्नांसाठी काम करणारा आणि वैयक्तिक संपर्क असलेला उमेदवार यंदा बाजी मारू शकतो, अशी चर्चा कारखाना कार्यक्षेत्रात सुरू आहे. त्यामुळे उमेदवारांची संख्या, मतांचे विभाजन आणि बंडखोरी यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीत नेमके कोणते राजकीय चित्र निर्माण होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


















