पुणे: गेल्या काही दिवसांपासून परिसरात कडक ऊन्ह आले. त्यातच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा उन्हाची तीव्रता अधिक असल्याने जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. ऊस हे अधिक पाणी लागणारे पीक असल्याने नियमित सिंचनाची गरज असते. मात्र, विजेचे भारनियमन आणि मर्यादित पाणीसाठा यामुळे अनेक शेतकऱ्यांना वेळेवर पाणी देता येत नाही. त्यामुळे उसाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आगामी काही दिवसांत चांगला पाऊस झाला नाही, तर उसाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता कृषी क्षेत्रातून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी अशी स्थिती आहे. पाऊस पडलाच नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सध्या उसाला शेतीपंपांच्या माध्यमातून पाणी दिले जात असले तरी वाढती उष्णता, विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे पिकांवर ताण निर्माण होत आहे. परिणामी काही भागांत उसाची पाने वाळू लागली असून पिके करपण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून ऊस लागवड केली आहे. आता पिक टिकवून ठेवण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. विजेचे भारनियमनही अडचणीचे ठरत आहे. लवकर दमदार पाऊस झाला नाही, तर उसाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो.


















