जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याने गाळपास आलेल्या उसाला अधिकचा दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये गाळप झालेल्या उसाला १३५ रुपये प्रति मे. टनप्रमाणे दुसरा हप्ता ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
गाळपास येणाऱ्या उसाला दर पंधरवड्याला पेमेंट देणारा कारखाना अशी ख्याती असलेल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याकडून २०२५-२६ हंगामासाठी पहिला हप्ता २ हजार ८०० रुपये प्रति मे. टनप्रमाणे यापूर्वी वेळेत अदा केलेला आहे. ऊस पिकाची व खरीप हंगामातील पिकांची जोपासना व्हावी याकरिता खते व मशागतीसाठी शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशाने १३५ रुपये प्रति मे. टनप्रमाणे एकूण २१ कोटी संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत.
या हप्त्यासह हंगामामध्ये गाळप केलेल्या उसास एकूण रक्कम २ हजार ९३५ रुपये प्रति मे. टनप्रमाणे पेमेंट ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना अदा झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी ऊस गळीतास दिला आहे अशा शेतकऱ्यांनी बँकेच्या संबंधित शाखेशी संपर्क साधून ऊस बिलाची रक्कम घेऊन जावी. कारखान्याने उच्चतम ऊस दर देण्याची परंपरा अबाधित ठेवली असून, आगामी होऊ घातलेल्या गळीत हंगामातही किफायतशीर दर देण्यासाठी कारखाना कटिबध्द आहे. नेहमीप्रमाणे आपला संपूर्ण ऊस कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ कारखान्याला घालून आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे मार्गदर्शक, माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.


















