पुणे : सोमेश्वर कारखान्यासाठी चुरशीची तिरंगी लढत, निवडणूक प्रचाराचा आज अखेरचा दिवस

पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. शुक्रवारी (ता. ९) प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने तीनही पॅनेलच्या सांगता सभांकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलच्या प्रचारासाठी मंत्री दत्तात्रेय भरणे, मंत्री मकरंद पाटील, आमदार विजय शिवतारे, सचिन पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्यासह माळेगाव कारखान्याचे पदाधिकारी, नगरपालिका व जिल्हा परिषद पदाधिकारी प्रचारात सक्रिय झाले आहेत. पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेलच्या प्रचाराची धुरा माजी आमदार संजय जगताप, माणिकराव झेंडे आणि सुदामराव इंगळे यांनी सांभाळली. या गटाच्या नेत्यांनीही कार्यक्षेत्रातील विविध गावांमध्ये दौरे करीत सभासदांच्या भेटीगाठी घेत प्रचाराला वेग दिला. तर युगेंद्र पवार यांच्या श्री सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेलने मात्र जाहीरनाम्यातील विधायक मुद्द्यांवर भर देत प्रचार सुरू ठेवला.

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी तिन्ही पॅनेल आपापल्या सभांमधून शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता असून प्रमुख नेते सभासदांसमोर कोणते मुद्दे मांडतात, याकडे लक्ष लागले आहे. शेवटच्या दिवशीच्या भाषणांमधून मतदारांना अंतिम आवाहन करताना कारखान्याच्या भविष्यासंदर्भातील भूमिका आणि विकासाचे व्हिजन स्पष्ट करण्याची संधी तिन्ही पॅनेलना मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या रिंगणात जोरदार प्रचार रंगला आहे. तिन्ही पॅनेलकडून विविध गावांमध्ये सभा, बैठका आणि सभासदांशी प्रत्यक्ष संपर्क साधत आपापल्या पॅनेलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात चौकाचौकांत मोठे कटआउट, फ्लेक्स आणि प्रचारफलक उभारण्यात आले आहेत. प्रचाराच्या वाहनांमधून सुरू असलेला ध्वनिप्रचार, गावागावांतील बैठका, उमेदवारांच्या भेटीगाठींमुळे निवडणुकीचा माहोल रंगतदार बनला आहे. कारखान्याचा कारभार चांगला करण्याची भूमिका मांडत ऊस उत्पादक सभासदांच्या हिताचे प्रश्न, कारखान्याचे भविष्यातील नियोजन आणि सक्षम व्यवस्थापन या मुद्द्यांवर तिन्ही पॅनेलनी प्रचारात भर दिल्याचे दिसून आले आहे.

ChiniMandi WhatsApp Channel
Bioenergy Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here