पुणे : नीरा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाच्या बाजारात बुधवारी (ता.२०) मोठी उलाढाल झाली. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गुळाची आवक झाली. बाजार समितीत एकूण ६९१ बॉक्स म्हणजेच सुमारे १३८ क्विंटल गुळाची आवक झाली.
बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार, गुळाच्या प्रतीनुसार दरात चढ-उतार दिसून आले. लिलावात गुळाला किमान ४४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर उत्कृष्ट प्रतीच्या गुळाला तब्बल ४५२५ रुपये प्रति क्विंटल असा उच्चांकी भाव मिळाला. दिवसाचा सरासरी दर ४४६० रुपये प्रति क्विंटल इतका स्थिर राहिला. शेतकऱ्यांसाठी सरासरी दर समाधानकारक ठरल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

















