पुणे : सध्या ऊस पिकावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव ठिकठिकणी दिसून येत आहे. पिकावरील हुमणीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना महागड्या रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून नफ्यात घट होते. या पार्श्वभूमीवर हुमणी नियंत्रणासाठी राज्य सरकारच्या कृषी विभाग आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)ने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. ठिकठिकाणी शिबिरांतून मार्गदर्शन केले जात आहे. या अंतर्गत शिरूर तालुक्यातील उरळगाव येथे कार्यशाळा झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना हुमणी नियंत्रणासाठी जैविक उपाययोजना, ऊस लागवड व खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी सुवर्णा आदक उपस्थित होत्या.
कार्यशाळेत जैविक औषधांच्या वापराबाबत विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले. व्हीएसआयच्या जैविक प्रयोगशाळेच्या प्रमुख डॉ. सुनीता साकोरे आणि जनसंपर्क अधिकारी राजेंद्र भोईटे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. सहायक कृषी अधिकारी जयवंत भगत यांनी ऊस लागवड, खत व्यवस्थापनाची माहिती दिली. अनेक शेतकऱ्यांनी जैविक औषधांची मागणी नोंदविली. यामध्ये सागर कोळपे, बापू कोळपे, अनिल सात्रस, बाळासाहेब सावंत, कैलास सात्रस, सेवानिवृत्त कृषी अधिकारी राजेंद्र सात्रस, रसिक पंदरकर, नवनाथ सात्रस, सिद्धार्थ वडघुले, ऋषिकेश गिरमकर, केदार वाघ आणि तात्याभाऊ सात्रस यांचा समावेश होता. कार्यक्रमास कृषी अधिकारी संतोष बेंद्रे, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संभाजी कांडगे, तुकाराम बेन, लालासाहेब वाघचौरे आदी उपस्थित होते. सागर कोळपे यांनी आभार मानले.


















