पुणे : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उतरणार असल्याची घोषणा युवा नेते युगेंद्र पवार यांनी सोमवारी (दि. ७) केली. यावेळी त्यांनी पक्षाच्या पॅनेलचे नावही जाहीर केले. ‘शेतकरी पॅनेल’च्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती बुधवारपासून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बारामती येथील पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत युगेंद्र पवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘‘दोन आठवड्यांपूर्वी निंबूत येथे पक्षाचा मेळावा घेऊन सभासद आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर पुरंदर, बारामती, खंडाळा आणि फलटण तालुक्यांमध्ये गावभेट दौरे करून सभासदांशी संवाद साधला. त्यातून निवडणूक लढविण्याबाबत सकारात्मक भूमिका समोर आली.’’
‘दादांचे नेतृत्व सर्वांना मान्य होते’
अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाच्या काळातील परिस्थिती वेगळी होती, असे सांगताना युगेंद्र पवार म्हणाले, ‘‘दादांचे नेतृत्व सर्वांना मान्य होते. अडचणीत असलेल्या सोमेश्वर कारखान्याला त्यांनी बाहेर काढले होते. सोमेश्वर, माळेगाव आणि छत्रपती कारखान्यांच्या कारभारावर त्यांचे बारकाईने लक्ष होते. ‘साहेबां’नंतर दादांचा साखर कारखान्यांच्या कारभाराचा सखोल अभ्यास होता. संचालकांना आवश्यक सूचना देत ते कारखान्याच्या कामकाजात लक्ष घालत असत.’’
कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत अद्याप समोरून कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, असा प्रस्ताव आल्यास ‘साहेबां’शी चर्चा करण्यात येईल आणि याबाबत त्यांचा निर्णय अंतिम राहील, असेही युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.
नव्या चेहऱ्यांना संधी देणार
‘‘कारखान्यात अनेक वर्षांपासून तेच चेहरे आहेत. नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी मिळालेली नाही. त्यामुळे स्वच्छ प्रतिमा असलेल्या आणि पारदर्शक कारभाराला प्राधान्य देणाऱ्या नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहोत,’’ असे युगेंद्र पवार यांनी सांगितले.
ऊस उत्पादकांना चांगला दर मिळावा, साखरेचा दर्जा सुधारावा, शेड्यूलनुसार ऊसतोड व्हावी, कामगार भरती गुणवत्तेच्या आणि मेरिटच्या आधारे व्हावी तसेच कारखान्याचा कारभार पारदर्शक असावा, या प्रमुख मुद्द्यांवर सभासदांसमोर जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कामगारांचे हित लक्षात घेऊनच ‘शेतकरी पॅनेल’ची उभारणी करण्यात येणार असल्याचेही युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


















