पुणे : प्रादेशिक सहसंचालकांनी (साखर) रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याबाबत नोटीस बजावली आहे. कारखान्याने ‘एनसीडीसी’कडे सादर केलेला कर्जमागणीचा प्रस्तावदेखील अपुऱ्या कागदपत्रांमुळे नाकारण्यात आला आहे. गेले सलग दोन गळीत हंगाम बंद असलेला घोडगंगा कारखाना तिसऱ्या गळीत हंगामातही सुरू होण्याची चिन्हे नाहीत. संचालक मंडळाला जर कारखाना सुरू करण्याबाबत काम करायचे नसेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी गटाने केली. शनिवारी (ता. १९) होत असलेल्या कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस सर्व सभासदांनी उपस्थित राहून सत्ताधारी वर्गाला जाब विचारावा, असे आवाहनही करण्यात आले.
गुरूवारी (ता. १७) येथे झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधी गटाकडून घोडगंगा कारखान्याबाबतची भूमिका मांडण्यासाठी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे, माजी संचालक सुधीर फराटे, सहकार नेते काका खळदकर, पीएमआरडीएचे सदस्य प्रकाश गव्हाणे आदी उपस्थित होते. कारखान्याची खासगीकरणाकडे वाटचाल सुरू असल्याचा आरोप कारखान्यातील विरोधी गटाकडून करण्यात आला.
कारखाना कामकाजात कुठलेही राजकारण न आणता राज्य शासनाच्या प्रतिनिधींशी, स्थानिक लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून कारखाना सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी भूमिका दादापाटील फराटे यांनी मांडली. कर्जासाठी गहाण ठेवलेल्या संचालकांच्या जमिनींवर बोजे चढले. या स्थितीत एकमेकाला दोष देत बसण्यापेक्षा, आमदारांवर टीकाटिपण्णी करण्यापेक्षा कारखाना कसा सुरू करता येईल, या विषयाला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, शिरूर तालुकाध्यक्ष वीरेंद्र शेलार, पंचायत समितीचे माजी सभापती दादासाहेब कोळपे, सदस्य दीपक पवार, माजी सदस्य राजेंद्र गदादे व रामभाऊ कदम, बाजार समितीचे संचालक राहुल गवारे, कुंडलिक शितोळे, रघुनंदन गवारे आदी यावेळी उपस्थित होते.


















