पुणे : सध्या साखरेचा दर तब्बल ७० ते ८० रुपये किलो, म्हशीच्या दुधाचा दर सुमारे ८० रुपये लिटर, तर चहापावडरचा दर ४०० रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. त्यातच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरातही वाढ झाल्याने चहा विक्रेत्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे चहाचे दर वाढले आहेत. चहा बनवण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आवडत्या चहाचे दरही वाढले आहेत. १० रुपयांना मिळणारा चहा आता १५ रुपयांना मिळत आहे. यातून चहाप्रेमींच्या खिशाला कात्री लागली आहे. साखरेच्या दरात झालेल्या विक्रमी वाढीचा फटका लघू खाद्य व्यवसायांनाही बसू लागला असून, छोट्या खाद्य व्यवसायांचे गणित बिघडले आहे. साखरेच्या वाढलेल्या दरामुळे साखर कारखान्यांना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी मिठाई, बेकरी आणि इतर लघू खाद्य व्यवसायांसाठी ही दरवाढ कडू ठरत आहे. महागाईचा परिणाम आता थेट सर्वसामान्यांच्या दैनंदिन चहाच्या कपावरही जाणवू लागला आहे.
मिठाई, केक, बिस्किटे, शीतपेये आणि चहासारख्या पदार्थांमध्ये साखरेचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. साखरेच्या दरवाढीचा थेट परिणाम उत्पादन खर्चावर होत असून, छोट्या व्यावसायिकांच्या नफ्याचे प्रमाण घटत आहे. किरकोळ बाजारात साखरेचे दर अनेक ठिकाणी ६० ते ७० रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने मिठाईची दुकाने, बेकरी, चॉकलेट व बिस्किट उत्पादक, आईस्क्रीम विक्रेते, रस विक्री केंद्रे, चहा-कॉफी दुकाने, घरगुती खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांचा उत्पादन खर्च वाढला आहे. आधीच वाढलेले दूध, तूप, तेल, मैदा, गॅस आणि इतर कच्च्या मालाचे दर यामुळे खर्चाचा ताण वाढला असताना साखरेच्या दरवाढीने त्यात आणखी भर पडली आहे. दरवाढीमुळे ग्राहक कमी प्रमाणात खरेदी करू लागल्यास उलट व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः लहान दुकानदारांकडे मोठ्या कंपन्यांप्रमाणे साठवणूक क्षमता आणि आर्थिक तरतूद नसल्याने त्यांना रोजच्या खरेदीवरच व्यवसाय चालवावा लागतो. त्यामुळे दरवाढीचा परिणाम त्यांच्या दैनंदिन उलाढालीवर जाणवत आहे.


















