पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. उपाध्यक्ष कांबळे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी इच्छुक संचालकांनी हालचाली वाढवल्या असून, उपाध्यक्षपदासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची चर्चा कारखाना परिसरात आहे. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे बोलले जात असल्याने, त्या कोणाला पसंती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इच्छुक संचालकांकडून फिल्डिंग लावली जात असली तरी त्यात उत्साह नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
कारखान्याच्या सत्तारुढ गटाच्या या कार्यकाळात आनंदकुमार होळकर, प्रणिता खोमणे, बाळासाहेब कामठे आणि मिलिंद कांबळे यांनी उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे. प्रत्येक वर्षी एका संचालकाला उपाध्यक्षपदी संधी देण्याची भूमिका पूर्वी अजितदादा पवार यांनी मांडली होती. त्यामुळे निवडीची उत्सुकता अधिक वाढली आहे. १२ ऑक्टोबर २०२१ रोजी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर आता पुन्हा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, ऑगस्टपासून निवडणूक प्रक्रियेची तयारी सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नुकत्याच सुनेत्रा पवार यांनी कारखान्यास भेट दिल्यानंतर उपाध्यक्षपदाचा निर्णय जाहीर होईल, अशी सभासदांची अपेक्षा होती. मात्र निर्णय लांबल्याने सभासदांमध्ये उलट-सुलट चर्चाना उधाण आले आहे.


















