पुणे : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांच्या हिताचा निर्णय घेत सर्वोच्च ३८०० रुपये प्रतिटन अंतिम ऊसदर जाहीर केला. कारखान्याचा दर ‘एफआरपी’पेक्षा तब्बल ५१५ रुपये अधिक आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी व मार्च महिन्यात गाळपासाठी तुटलेल्या उसालाही अनुदानासह अनुक्रमे ३९०० रुपये व ४००० रुपये प्रतिटन असा विक्रमी दर मिळणार आहे. याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व संचालक जितेंद्र निगडे यांचा गुळुंचे-कर्नलवाडी (ता. पुरंदर) ग्रामस्थांच्यावतीने रविवारी सत्कार करण्यात आला.
सोमेश्वर साखर कारखान्याने वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर कारखान्याने घेतलेल्या या निर्णयाचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून स्वागत होत आहे. ऊस हे परिसरातील शेतकऱ्यांचे प्रमुख आर्थिक पीक असल्याने उसाला मिळणाऱ्या दराकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. वाढती मशागत, खते, औषधे, मजुरी, सिंचन तसेच वाहतूक खर्चाचा विचार करता उसाला समाधानकारक दर मिळणे ही उत्पादकांची प्रमुख अपेक्षा असते. सहकार क्षेत्रात शेतकरी हा केंद्रबिंदू मानून कारखान्याची वाटचाल सुरू असून मिळालेल्या चांगल्या दराचा ऊस उत्पादकांना त्याचा फायदा होत असल्याचे संतोष निगडे यांनी सांगितले. यावेळी कांचन निगडे, संतोष निगडे, अतुल निगडे, सुनील निगडे, रूपेश निगडे, सागर निगडे, महेश निगडे यांच्यासह गुळुंचे कर्नलवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















