पुणे : ऊस टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा हंगाम फेब्रुवारीत संपला. मात्र, सोमेश्वर साखर कारखान्याने दिलेला उत्तम दर, फेब्रुवारीपासूनच्या तोडीला दिलेले अनुदान यामुळे शेतकऱ्यांनी अन्य कारखान्यांना ऊस न दिल्याने गाळप समाधानकारक झाले. राज्यात ‘सोमेश्वर ने गाळपात सातवे तर साखरनिर्मितीत चौथे स्थान पटकावले आहे. जवळपास ३५,५०० एकर ऊस तोडला गेला. कारखान्याने गेल्या १४२ दिवसांत १२ लाख ९८ हजार टन गाळप केले. कारखान्याने उच्चांकी १५ लाख ५७ हजार क्विंटल साखर निर्मिती केली आहे. कारखान्याचा गेल्या २६ वर्षातला सर्वोच्च, १२.२७ टक्के इतका साखर उतारा आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी दिली. उसाची पळवापळवी, आमिषे सुरू असतानाही बाहेरच्या कारखान्यांना ऊस न देता सभासदांनी ‘सोमेश्वर’ प्रती निष्ठा आणि विश्वास प्रकट केला आहे असे ते म्हणाले.
कार्यकारी संचालक राजेंद्र यादव म्हणाले की, सभासदांचा पाठिंबा, दिवंगत नेते अजितदादा पवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मार्गदर्शन, संचालक मंडळाची धोरणे, कामगार- अधिकाऱ्यांची आणि वाहतूकदार- तोडणी कामगारांची साथ या टीमवर्कमुळे यश मिळाले. कारखान्याची गाळपक्षमता दैनंदिन ७५०० टन असताना दैनंदिन ९१०० टन प्रतिदिन क्षमतेने कारखाना चालला. तोडणी नियोजन, तांत्रिक क्षमता, अचूक व्यवस्थापन यामुळे साखर उतारा ११.९९ टक्के इतका झाला. बी हेवी मोलासेसनिर्मितीमुळे उताऱ्यात ०.२८ टक्के घट झाली होती. शेतकऱ्यांना एकरी ३६ ते ३७ टन उत्पादन मिळाले. यावर्षी तब्बल २६ हार्वेस्टरद्वारे एक लाख ७० हजार टन ऊस तोडला आहे. जेमतेम ५० हजार टन ऊस बाहेर गेला तर ९८ हजार टन गेटकेन आणण्यात यश आले.


















