राहू : दौंड तालुक्यातील पाटेठाण येथील श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी १६ व्या वार्षिक स्नेह मेळाव्यानिमित्त आपली पंचायत, आपला कारखाना!, आपला परिवार, आपला अभिमान!! या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळी कारखान्याच्यावतीने यावेळी ११५ ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या कारखाना कर्मचारी पाल्यांचे प्रशस्ती पत्रक देऊन कौतुक करण्यात आले. कारखान्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खात्यास फिरता चषक देण्यात आला. यावर्षीचा उत्कृष्ट खाते फिरता चषक कारखान्यातील सिव्हिल विभागास देण्यात आला. यावेळी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे कार्यकारी संचालक अजित चौगुले, दि. डेक्कन शुगर टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशनचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश पवार, डॉ. डी. डब्ल्यू, ठवाळ, केन बायोसिसचे एम.डी. कुलकर्णी, दौंड पंचायत समितीचे सभापती सुखदेव चोरमले आदी उपस्थित होते.
माजी आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी कारखान्याची संथ गतीने व शांततेत प्रगती केलेली दिसून येत आहे. कुठलीही घाई न करता केलेली प्रगती चिरकाल टिकणारी असते. श्रीनाथ म्हस्कोबाची प्रगती योग्य दिशेने जात आहे. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्र प्रदेश ग्रामविकास प्रमुख विनय कानडे हे होते. कारखान्याचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक पांडुरंग राऊत यांनी कारखान्याने आतापर्यंत जी प्रगती केली आहे. त्यामध्ये आपल्या सर्वांचा मोलाचा सहभाग असल्याचे सांगितले. कारखान्यामार्फत पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ व डीएसटीएचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन यांचे मार्गदर्शन करीत आहेत असे त्यांनी नमुद केले. कारखान्याचे संचालक किसन दिनकर शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश टेमगिरे व केन मॅनेजर एस. बी. टिळेकर यांनी केले.


















