पुणे : दौंड तालुक्यात अन्न व औषध पुणे प्रशासनाने केलेल्या कारवाईत साडेसोळा टन गूळ आणि २० टन साखरेचा साठा जप्त केला असून, जप्त मालाची एकूण किंमत सुमारे १७ लाख रुपये आहे. उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या गुळाचा गोडवा वाढविणे आणि आकर्षक रंगासाठी साखरेची भेसळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मालाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ तसेच संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित आस्थापनांविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे पुणे विभागाचे सहआयुक्त दिगांबर भोगावडे यांनी दिली.
सहआयुक्त भोगावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरी पारधी, सहजपूर आणि खामगाव फाटा परिसरातील गूळ उद्योगांमध्ये या अनियमितता आढळल्या. तपासणीदरम्यान गुळाचा गोडवा वाढवण्यासाठी त्यामध्ये साखरेचे मिश्रण करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. २९ मे रोजी विविध गूळ उत्पादन आस्थापनांची तपासणी केली. काही ठिकाणी विनापरवाना उत्पादन, ग्राहकांची दिशाभूल करणारे वेष्टन, उत्पादन प्रक्रियेच्या स्वच्छता मानकांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. गुळाची बांधणी नियमानुसार न केल्याचेही निदर्शनास आले. काही आस्थापनांकडे आवश्यक अन्न सुरक्षा परवानाही नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे.


















