पुणे : साखर कारखाने बंद होऊन दोन महिने उलटले, तरी सातारा जिल्ह्यात सुमारे ३८० कोटी रुपयांची एफआरपी शेतकऱ्यांना मिळालेली नाही. थकीत एफआरपी लवकरात लवकर न मिळाल्यास ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा घालणार, असा इशारा पवित्र्यात भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष प्रविण पी. बाबर यांनी दिला आहे. .
राज्यातील साखर कारखान्यांकडे १००० कोटींच्या आसपास एफआरपी थकीत आहे. अशा संकटाच्या काळात ऊस उत्पादकांना आधार देण्याऐवजी राज्यातील सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकार छुप्या पद्धतीने साखर कारखानदारांची पाठराखण करत असल्याचा आरोप प्रविण बाबर यांनी केला आहे. तीन वेळा सुनावणी होऊनही अद्याप कारखान्यांवर RRC (मालमत्ता जप्ती) कारवाई का झाली नाही? असा संतप्त सवाल त्यांनी निवेदनाद्वारे विचारला आहे.
१७ मार्च २०२५ च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार थकीत एफआरपीबाबत कडक पावले उचलणे बंधनकारक होते. मात्र, कारवाईत होणारा विलंब हा न्यायालयाचा अवमान असून, याविरोधात भूमिपुत्र संघटना उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे, असेही बाबर यांनी सांगितले. आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी साखर आयुक्त कार्यालयाची असेल, असा इशारा बाबर यांच्यावतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि सहकार मंत्र्यांना देण्यात आला आहे.


















