पुणे : हरियाणा येथील रसवंतीगृहांसाठी सध्या महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर ऊस खरेदी केली जात आहे. ऊस टंचाईमुळे सशक्त उसाला अधिक मागणी आणि दर मिळू लागला आहे. त्यातून शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा प्रगतिशील शेतकरी बाळासाहेब ढमढेरे व त्यांचे पुत्र अक्षय ढमढेरे यांच्या शेतातील ११ महिन्यांच्या उसाला ५,००० रुपये टन असा बाजारभाव मिळाला आहे. उसाला टनाला पाच हजार रुपये बाजारभाव व्यापाऱ्यांनी दिल्याने ढमढेरे यांनी समाधान व्यक्त केले.
विठ्ठलवाडी येथील ऊस व्यापारी संपत गवारे यांनी ढमढेरे यांचा ऊस खरेदी केला. हा ऊस ट्रकमधून हरयाणा येथील रसपानगृहासाठी रवाना करण्यात आला. ढमढेरे यांनी लागवड केलेल्या ८६०३२ या जातीच्या उसाला एकरी ७० टन उतारा निघत आहे. ऊस लागवडीसाठी गणेश गायकवाड यांनी ढमढेरे यांना मार्गदर्शन केले अशी माहिती देण्यात आली. शेतमालाला अशाच प्रकारे चांगला बाजारभाव मिळाल्यास शेतकरी कर्जाच्या विळख्यातून मुक्त होईल, अशी अपेक्षा ढमढेरे यांनी व्यक्त केली आहे.


















