पुणे : माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याने सीबीजी बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी निविदा (टेंडर) प्रक्रिया सुरू केली असून, कारखान्याच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पुढाकारामुळे हा सुमारे ७५ कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष अजित पवार यांनी गतवर्षी कारखान्यात सीबीजी प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्याची अंमलबजावणी आता वेगाने सुरू झाली आहे. कारखान्यात प्रस्तावित सीबीजी प्रकल्पामुळे उसाच्या मळीसारख्या उप उत्पादनाचा मूल्यवर्धित वापर होणार असून, स्वच्छ ऊर्जा निर्मितीबरोबरच सेंद्रिय खताचे उत्पादनही होणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘गोबरधन’ योजनेमुळे माळेगाव कारखान्याचा सीबीजी प्रकल्प अधिक सक्षमपणे उभारता येणार आहे. केंद्राने कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) क्षेत्राला चालना देण्यासाठी ‘गोबरधन’ योजनेला २३,७३१ कोटी रुपयांच्या तरतुदीसह मंजुरी दिली आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांसाठी नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कारखान्याने आपल्या प्रकल्पाला गती दिली आहे. सीबीजी प्रकल्पामुळे कारखान्याच्या उत्पन्नात वाढ होण्यासह स्थानिक रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, याचा सभासदांना दीर्घकालीन आर्थिक लाभ मिळणार असल्याची माहिती कारखान्याचे संचालक योगेश जगताप यांनी व्यक्त केला.


















