पुणे : पारगावतर्फ अवसरी बुद्रुक येथे सोमवारी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे होते. माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, पूर्वा वळसे-पाटील, उपाध्यक्ष अॅड. प्रदीप वळसे-पाटील, प्रकाशराव पवार आदी उपस्थित होते. कारखान्याचे संस्थापक व माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सभेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. तर सभा संपल्याचे जाहीर झाल्यानंतर माजी अध्यक्ष देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे व त्यांच्या समर्थकांनी “आम्हाला बोलू दिले नाही”, “आम्ही निषेध करतो”, “भागविकास निधीचा ठराव मंजूर झालाच नाही” अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला. त्याला वळसे पाटील समर्थकांनी प्रत्युत्तर दिल्याने काही काळ घोषणाबाजी झाली. नंतर निकम व त्यांच्या काही समर्थकांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडून प्रशासनावर विविध आरोप केले.
यावेळी दिलीप वळसे-पाटील यांनी निकम यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला हाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. कारखान्याचे कामकाज पारदर्शक असून सभासदांच्या हितालाच प्राधान्य दिले जाते. मात्र, जाणीवपूर्वक वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. सभासदांचा कारखान्यावर पूर्ण विश्वास असून संचालक देवदत्त निकम यांचा गोंधळाचा डाव सभासद यशस्वी होऊ देणार नाहीत. कारखान्याने देशपातळीवर नावलौकिक मिळविला असून राज्य व देशपातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले आहेत. कारखान्याचे कामकाज पारदर्शक असून सभासदांच्या हिताला प्राधान्य दिले जाते. तुम्ही दहा जन्म घेतले तरी मी कुठेही भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध होणार नाही. विनाकारण दिशाभूल करण्याचा धंदा बंद करा. दरम्यान, सभेनंतर विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी व प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन झाले.


















